नांदेड - रेल्वे विभागाकडून नव्या २०० विशेष गाड्या सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. त्यात नांदेड-पुणे-नांदेड एक्सप्रेस व नांदेड-मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेस या दोन गाड्यांचा समावेश आहे. या दोन्ही गाड्या नांदेडहून सुटणार आहे. तर जालना येथून मुंबईला जाण्यासाठी जनशताब्दी एक्सप्रेस देखील सुरू होणार आहे. मराठवाड्यातून तीन रेल्वेगाड्या धावणार असल्याने प्रवाशांची गैरसोय बऱ्याच प्रमाणात दूर होऊ शकते.
१५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या सणासुदीच्या दिवसांत दोनशे विशेष रेल्वे चालवल्याचे रेल्वे बोर्डाने निश्चित केले आहे. राज्य सरकारांच्या गरजेनुसार त्यापेक्षा अधिक रेल्वे गाड्या देखील सुरू होऊ शकतात, अशी माहिती रेल्वे बोर्डाच्या वतीने देण्यात आली. सध्या रेल्वेची नियमित प्रवासी वाहतूक बंद आहे. 1 जून पासून रेल्वे विभागाने देशभरात लांब पल्ल्याच्या शंभर विशेष गाड्या सुरू केल्या होत्या. त्यात नियमीतपणे धावणाऱ्या नांदेडच्या सचखंड एक्सप्रेसचा समावेश आहे. त्यानंतर परभणी-हैद्राबाद-परभणी ही विशेष रेल्वेगाडी दररोज सुरू करण्यात आली. नांदेडहून पुणे व मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. एसटीने प्रवास करताना रस्त्यावरील होणारा त्रास, लागणारा वेळ व तिकीटाची अधिक रक्कम सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. राज्य सरकारने अनलॉकचे टप्पे सैल केल्यानंतर रेल्वे बोर्डानेही राज्यात काही रेल्वे सुरू करण्याचे ठरविले आहे.
१२ सप्टेंबरपासून तिसऱ्या टप्प्यात नव्या ८० विशेष रेल्वेगाड्या सुरू करणार असल्याची देखील माहिती आहे. याबाबत सर्व विभागीय व्यवस्थापकांना आपापल्या भागातील स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून कोरोना स्थितीचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत दोनशे गाड्या सुरू करण्याचे नियोजन आम्ही केले असून यापुढे कदाचित अधिक गाड्याही सुरू होऊ शकतात. राज्य सरकारच्या गरजेनुसार प्रवासी वाहतुकीचा दैनंदिन आढावा घेण्याचा निर्णयही रेल्वेने घेतल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. तसेच जेथे गरज असेल, तेथे प्रवासी गाड्याही सुरू केल्या जातील. सध्या सुरू असणाऱ्या पुरवणी गाड्यांचे (क्लोन ट्रेन) भारमानही साठ टक्क्यांच्या आसपास असल्याची माहिती यादव यांनी दिली. जेथे पुरवणी गाड्या भरतील, अशा ठिकाणी प्रतीक्षा यादी संपुष्टात आणण्यासाठी आणखी गाड्या सोडण्याची योजना असल्याचेही ते म्हणाले.
रेल्वे बोर्डाकडून पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद या प्रमुख शहरांना जोडणाऱ्या विशेष रेल्वे सुरू करण्यावर भर आहे. काही आंतरराज्य रेल्वे आठवढ्यातून एकदा, दोनदा किंवा तीनवेळा सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. नांदेडहून सुटणाऱ्या तपोवन आणि पुणे एक्सप्रेसची वेळ पुर्वीप्रमाणेच राहणार आहे. परंतु, या रेल्वेगाड्या विशेष गाड्या म्हणून येत्या २० ऑक्टोबरपासून धावण्याचा प्रस्ताव आहे. याबद्दलचे सविस्तर वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे. रेल्वे गाड्या सुरू होणाच्या किमान पाच दिवस आधीपासून संबंधित रेल्वेकरिता आरक्षण निश्चित करता येणार आहे. आसन राखीव असल्याशिवाय कोणत्याही प्रवाशाला रेल्वेत चढता येणार नाही.