नांदेड - शहरात अजून २० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ते गुरुद्वारा लंगरसाहिबमधील कर्मचारी आहेत. नांदेडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आता २६ वर पोहोचली असून आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नांदेड आता रेडझोनमध्ये जाण्याची शक्यता आहे.
गुरुद्वारा लंगरसाहिब परिसरातील कार्यरत ९७ व्यक्तींचे ३० एप्रिल आणि ०१ मे रोजी स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी २० रुग्ण हे कोरोना विषाणूमुळे बाधित आहेत आणि २५ व्यक्तींचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. तसेच ११ स्वॅब हे अनिर्णित आहेत. उर्वरित अहवालांची प्रतीक्षा आहे. संबंधित व्यक्तींना एन. आर. आय. भवन कोविड केयर सेंटर येथे दाखल करण्यात आलेले आहे. मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित झालेल्या गुरुद्वारा परिसरात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.
दरम्यान, कोरोनाचे नव्याने २० रुग्ण नांदेडमध्ये सापडल्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या २६ झाली आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी तातडीची बैठक बोलावली होती. यावेळी सर्व विभागप्रमुख हजर होते.
नांदेडमध्ये १ हजार २३५ संशयितांची नोंद -
नांदेड येथे १२३५ संशयितांची नोंद झालेली आहे. यापैकी ११२० जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी १००९ निगेटिव्ह असून ६५ जणांचा अहवाल प्रलंबित आहे. एकूण घेण्यात आलेल्या ११२० स्वॅबपैकी आजपर्यंत ६ आणि नव्याने आलेले २० रुग्णांचे स्वॅब, असे एकूण २६ पॉझीटिव्ह आहेत. नांदेडमधील पिरबुरहान नगर एक आणि परभणीमधील सेलू येथील महिला, या दोघांचा औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे मृत्यू झाला आहे.