नांदेड - चीनमधील धोकादायक कोरोना व्हायरसने अमेरिकेसह डझनभर देशांना घेरले आहे. जगातील सगळ्या देशांमध्ये हा व्हायरस पसरत असल्याचे दिसत आहे. यादरम्यान भारतातही कोरोना व्हायरसचा धोका वाढला आहे. या विषाणूचे 2 संशयित रुग्ण नांदेडमध्ये आढळल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
या रुग्णांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. हे 2 संशयित चीनमध्ये 4 महिने नोकरी करून भारतात परतले आहेत. नांदेडमध्ये पहिले संशयित 2 रुग्ण आढळल्यामुळे प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील दोन तरुण चीनला नोकरीसाठी गेले होते. तेथे त्यांनी 4 महिने वास्तव्य केले. काही दिवसापूर्वीच ते भारतात परतले. या तरुणांना ताप, सर्दी, श्वसनास त्रास सुरू होता. प्राथमिक उपचार करूनही त्रास सुरू असल्यामुळे त्यांनी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात धाव घेतली. कोरोना विषाणूमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क असल्यामुळे त्या दोघांची पार्श्वभूमी समजल्यानंतर त्यांना रुग्णालयातील स्वतंत्र कक्षात भरती करण्यात आले आहे. या दोघांच्या आजाराचा इतर कोणालाही संसर्ग होऊ नये, याची विशेष खबरदारी घेतली जात आहे.