नांदेड - जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील देशमुखवाडी येथे शेतात सोयाबीन काढण्यासाठी गेलेल्या आजी आणि नातीचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये एक महिला व दोन चिमुकल्या मुली जखमी झाल्या आहेत. जखमींमध्ये एक गर्भवती महिला व दीड वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे. एकाच कुटुंबात काळाने घाला घातल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे वाचलं का? - नाशिकमध्ये अंगावर वीज कोसळून तिघांचा मृत्यू
देशमुखवाडी येथील सिताबाई तुकाराम वानोळे (वय ६०), प्रियंका कैलास वानोळे (वय-०८), जयश्री कैलास वानोळे (वय-२८), वर्षा विलास वानोळे (वय ८) हे आपल्या शेतात सकाळी सोयाबीन कापणीसाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत दीड वर्षांची साक्षी वानोळे होती. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटांसह पाऊस सुरू झाला. पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी शेतातील झोपडीत थांबले आसता वीज पडली. यामध्ये ५ जणी जखमी झाल्या. यामध्ये सिताबाई तुकाराम वानोळे व प्रियंका कैलास वानोळे या आजी व नातीचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी जयश्री वर्षा, साक्षी यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
हे वाचलं का? - नंदुरबारमध्ये झोपडीवर वीज कोसळली ; १ ठार
गावात पोलीस निरीक्षक राजेन्द्र मुंडे, तलाठी एस. आर. घुगे, जमादार नरेंद्र तिडके, दिपक कंधारे, पोलीस पाटील बबन देशमुखे यांनी भेट दिली. महसूल प्रशासनाने घटनेचा पंचनामा करून अहवाल पाठविला आहे. निमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.