नांदेड - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोमवारी (दि. ४) शेवटची तारीख होती. सोमवारी अनेक इच्छुक उमेदवारांरी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे जिल्ह्यात जवळपास १०० ग्रामपंचायती बिनविरोध आल्या आहेत. दरम्यान, निवडणूक रिंगणातील शिल्लक उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटपही सोमवारी ग्रामपंचायत करण्यात आले.
१ हजार १३ ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारीला मतदान
जिल्ह्यातील १ हजार १३ ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारीला निवडणूक होत आहे. त्यासाठी निवडणूकप्रक्रिया सुरू आहे. सोमवारी ( दि .४ ) नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची शेवटची तारीख होती. यादिवशी अनेकांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यानुसार जवळपास शंभर ग्रामपंचायती बिनविरोध आल्या आहेत.
ग्रामस्तरावर मनधरणी
अशाही अनेक ग्रामपंचायती आहेत, जेथे एक किंवा दोन वॉर्डातील जागा बिनविरोध आल्या आहेत. ग्रामपंचायतची निवडणूक लढवून गावाचा कारभारी होण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. निवडणुकीत लागणारा पैसा तसेच वेळेची बचत व्हावी यासाठी आपली ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यातदेखील काही जणांना यश आले आहे. जिल्ह्यात जवळपास शंभर ग्रामपंचायती बिनविरोध आल्या आहेत. निवडणूक टाळून ग्रामपंचायत बिनविरोध यावी, यासाठी गेले काही दिवस गावपुढारी प्रयत्न करीत होते. इच्छुक उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी अनेकांची मनधरणी केली जात होती. यात बऱ्याच जणांना यशही आले, त्यामुळे येथे आता निवडणूक होणार नाही.
लोकप्रतिनिधीच्या बक्षीस योजनेला अनेक गावांचा प्रतिसाद
बिनविरोध येणाऱ्या ग्रामपंचायतींना ५ ते १० लाखांपर्यंत विकासनिधी देण्याचे आश्वासन नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर तसेच हिंगोलीचे खा. हेमंत पाटील यांनी यापूर्वीच दिले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक ग्रामपंचायती बिनविरोध काढण्यात आल्या.
कंधार तालुक्यातील ग्रामपंचायत 30 वर्षानंतर बिनविरोध
कंधार तालुक्यतील वंजारवाडी या गावाची ग्रामपंचायत पहिल्यांदाच बिनविरोध निघालीय 30 वर्षानंतर गावपुढाऱ्यांनी एकत्र बसून यंदा दोन्ही पॅनलला अडीच अडीच वर्षे सरपंच म्हणून दोन्ही महिलांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 7 पैकी 4 महिला सदस्य या ग्रामपंचायतीवर आहेत. या गावातील नागरिकांनी ही ग्रामपंचायत महिलांच्या ताब्यात दिली आहे. विशेष म्हणजे या गावातील वारकरी सांप्रदायातील सगुणाबाई परमेश्वर गीते यांना बिनविरोध पहिली महिला सरपंच म्हणून बहुमान मिळाला आहे.