नांदेड - अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून तिच्यावर अत्याचार करून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस न्यायालयाने १० वर्षे सक्त मजुरी व १५ हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात आरोपीची डीएनए चाचणी महत्वपूर्ण ठरली.
शहरापासून जवळच ब्रम्हणवाडा येथे राहणारी पीडित मुलगी घरात एकटीच होती. हे पाहून गंगाधर कैलास भारती हा घरात गेला. तिच्यावर अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. काही काळाने पीडित मुलगी गर्भवती झाली. तिला झालेल्या बाळाचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी गंगाधर भारती याच्याविरुद्ध अत्याचार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलिस निरीक्षक नितीन खंडागळे यांनी या घटनेचा तपास करून दोषारोपत्र न्यायालयात सादर केले. न्यायालयाने एकूण ११ साक्षीदार तपासले. आरोपी आणि पीडितेची डीएनए चाचणी करण्यात आली. दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायाधीशांनी आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.