नांदेड - बकरी ईदला बोकडाची कुर्बानी देण्याची मुस्लिम बांधवांची प्रथा आहे. प्रत्येक मुस्लिम बांधव यथाशक्ती बोकड खरेदी करून ईदच्या दिवशी त्याची कुर्बानी देऊन अल्लाहला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे सध्या बाजारात बोकडांची मागणी वाढली आहे. मात्र, नांदेड जिल्ह्यात असा एक बोकड आहे ज्याची किंमत एका आलिशान कार एवढी आहे.
नवनाथ गायकवाड यांच्याकडे एक घोड्यासारखा रुबाबदार आणि डौलदार शरीरयष्टीचा एक बोकड आहे. नवनाथ यांनी याचे नाव 'अब्दुल' असे ठेवले आहे. सध्या अब्दुलचे वय अवघे अडीच वर्ष आहे. तर अब्दुलची डौलदार चाल आणि शरीरयष्टी एवढेच त्याचे महत्व नाही, तर त्याच्या डोक्यावर आहे चंद्रकोर आहे. चंद्रकोर मुस्लिम धर्मात पवित्र मानली जाते, त्यामुळे आता बकरी ईद असल्याने अब्दुलला विक्रीसाठी बाजारात नेण्यात येते. ग्रामीण बाजारात अब्दुलला साडेसात लाखांची मागणी आली आहे. मात्र, त्याच्या मालकाला नवनाथ यांना अब्दुलची 10 लाख रुपये किंमत अपेक्षित आहे.
शेंगदाणा पेंड आणि हरभरा हे अब्दुलचे रोजचे खाद्य आहे. त्याला दिवसातून 3 वेळा हे खाद्य देण्यात येते. आतापर्यंत नवनाथ यांनी अब्दुलवर सुमारे 2 लाख रुपये इतका खर्च केला आहे. त्यामुळे अडीच वर्षांपासून अब्दुलचे पालनपोषण करणारे नवनाथ या अब्दुलमुळेच लखपती होणार यात काही शंका नाही.