नागपूर - काल जाहीर झालेल्या नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या निकालात काँग्रेस पक्षाची सरशी झाली आहे. तर इतर सर्वच राजकीय पक्षांना नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे उपराजधानी नागपूर शहरात येत्या काळात वर्चस्वाची लढाई रंगणार हे स्पष्ट झाले आहे. २०२२ वर्षाच्या सुरुवातीलाच नागपूर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे, मात्र जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात बदललेल्या राजकीय समीकरणामुळे भारतीय जनता पार्टीची धाकधूक वाढली आहे. तर गेल्या १५ वर्षांपासून कायम नागपूरच्या स्थानिक राजकारणात बॅकफूटवर पडलेल्या काँग्रेसचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला आहे. यावेळी नागपूर मनपामध्ये सत्ता परिवर्तन करू, असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांना वाटू लागला आहे.
भाजपाला आत्मचिंतनाची गरज
नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत १६ पैकी तब्बल ९ तर पंचायत समिती पोटनिवडणुकीत ३१ पैकी २१ जागा जिंकून काँग्रेस पक्षाने पुन्हा आपली ताकत वाढवायला सुरुवात केली आहे. तर सलग दोन वेळा जिल्हा परिषद निवडणुकीत झालेला पराभव आणि पदवीधर निवडणुकीत मिळालेली मात यामुळे भाजपाला आत्मचिंतन करावे लागणार आहे.
भाजपाच्या १५ वर्षाच्या सत्तेला धोका
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे होम ग्राउंड असलेल्या नागपूर शहराच्या स्थानिक राजकारणात भाजपाने गेल्या १५ वर्षात जम बसवलेला आहे. नागपूर महानगरपालिकेत सलग १५ वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. मात्र राज्यात भाजपाचे सरकार गेल्यापासून स्थानिक भाजपाला उतरती कळा लागली आहे. नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने सरशी केल्यामुळे आता भाजपाच्या गडाला सुरुंग लावण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. तर भाजपाचे १५ वर्षातील कुशासन जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचे काँग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
भाजपा विरुद्ध काँग्रेस थेट लढत होणार
राज्याच्या राजकारणात भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे चार प्रमुख पक्ष आहेत. मात्र नागपूरच्या स्थानिक राजकारण केवळ भाजपा आणि काँग्रेस या दोन पक्षांचे अस्तिव दिसून येत असल्यामुळे येत्या काळात होणाऱ्या नागपूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजपा असाच सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.