नागपूर - मौदा शहरातील एका 14 वर्षीय विद्यार्थ्यांने आई रागावल्याच्या कारणाने नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मनिषलाल बहादुर पटले असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. मौदा येथील शिर्डी साई विद्यालयात इयत्ता नववीत शिकत होता.
मनिषलाल पटले हा शाळा सुटल्यानंतर थेट घरी न जाता मित्रांसोबत भटकत होता. या कारणावरून त्याच्या आईने आतापर्यंत कुठे होता, अशी विचारणा करून त्याला रागावले. आईने रागावल्याच्या कारणावरून संतापलेला मनिषलाल हा सायकलने मौदा येथील जुन्या पुलावर पोहचला. त्यावेळी त्या परिसरात वर्दळ होती. मानिषलालने सायकल पुलावरच सोडून दिली आणि थेट नदीत उडी घेतली. नदीत पोहण्यासाठी उडी घेतली असावी असा समज तेथील नागरिकांचा झाला. मात्र बराच वेळ तो बाहेर न आल्याने त्याचा शोध सुरू केला. मात्र त्याचा काहीच पत्ता लागला नाही.
दरम्यान सदर घटनेची माहिती मौदा पोलीसांना देण्यात आली. पोलिसांनी शोधमोहीम राबवली. परंतू 4 दिवस त्याचा मृतदेह आढळून आला नाही. शिवाय विशेष शोधपथकालाही पाचारण करण्यात आले होते. परंतु त्यांनाही अपयश आले. कन्हान नदीचा प्रवाह जास्त असल्यामुळे शोध-मोहिमेदरम्यान अडचणीला सामना करावा लागत होता. अखेर मौदा तालुक्यातील नवेगाव शिवारात नदीच्या काठावरील गाळात मानिषलाल याचा मृतदेह रुतलेल्या परिस्थिती आढळून आला. मनिषलालाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता.