नागपूर - शहराच्या सीमेवर असलेल्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रावणीनगर येथे असलेल्या बौद्ध विहार समोरच एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. आकीब अब्दुल सत्तार (वय २६) असे मृताचे नाव आहे. त्यावर शहरातीलच लकडगंज आणि वाठोडा पोलीस ठाण्यात विविध कलमांच्या अंतर्गत दोन गुन्ह्यांची नोंद आहे. आर्थिक देवाणघेवाणीतुन आकीबचा खून झाला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी प्रकाश तोतरे सह चार आरोपींना अटक केली आहे.
आज दुपारच्या सुमारास श्रावणी नगर येथे असलेल्या मैत्री बौद्ध विहार समोरच मुख्य आरोपी प्रकाश आणि त्याचे तीन मित्र बसले होते. त्याचवेळी मृतक आखीब हा त्याठिकाणी आला. सुरवातीला अगदी सामान्यपणे त्यांच्यात बातचीत झाली,मात्र त्यानंतर पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद उफाळून आला होता. दरम्यान वाद इतका विकोपाला गेला की प्रकाश आणि आकीब मध्ये हाणामारी सुरू झाली होती. प्रकाशचे मित्रसुद्धा आकीबला मारहाण करत असताना एका एका आरोपीने आकीबच्या गळ्यावर चाकूने वार केला ज्यामध्ये त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती समजताच वाठोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. परिस्थिती तणावपूर्व झाल्याने पोलीस उपायुक्त लोहित मतानी हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी प्राथमिक तपासाला सुरवात करताच आरोपींची नावं निष्पन्न होताच पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
खंडणी वसुलीच्या वादातून घडली घटना
मृतक आकीब अब्दुल सत्तार हा ऑटो चालकाचे काम करतो,या शिवाय तो धमकावून खंडणी वसूल करण्याचं काम करायचा. याच विषयावरून आरोपी प्रकाश सोबत वाद झाला होता. त्यातूनच हे हत्याकांड घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.