नागपूर - 21 जूनला जागतिक योग दिनानिमित्त आज नागपुरातील जगप्रसिद्ध आंतराष्ट्रीय योग खेळाडू धनश्री लेकुरवाले आणि गिनीज बुक रेकॉर्डमधे नाव गाजवणारी जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती आमगे यांच्या सोबत शेकडो नागपूरकरांनी योगासने केली. यावेळी योगामध्ये तरुणांनी भविष्य घडवण्याचे आवाहन धनश्रीने केले.
21 जूनला जगभरात योग दिवस साजरा केला जातो. योग दिनाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना आज नागपूरच्या सीए मार्गावरील आंबेडकर गार्डन येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे. गेल्या काही काळात योग अभ्यासाचे महत्व सर्वसामान्यांना कळू लागले आहे. निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगायचे असल्यास नियमित योग करावा असा सल्ला अनेक योगाभ्यासक देतात. संयुक्त राष्ट्राने 2014 साली २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. तेव्हा पासून प्रत्येक 21 जूनला भारतासह जगभरातील 200 देशांमध्ये योग केला जातो.
त्या अनुषंगाने 21 जूनला अनेक ठिकाणी योग अभ्यासाचे आयोजन केले आहे. नागपुरात योग दिनाच्या एक दिवस आधी पासूनच योग शिबिरांचे आयोजन केले जात आहे. आज नागपूरच्या सीए मार्गावरील आंबेडकर गार्डन येथे जगप्रसिद्ध आंतराष्ट्रीय योगा खेळाडू धनश्री लेकुरवाले आणि गिनीज बुक रेकॉर्डमधे नाव गाजवणारी जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती आमगे यांच्या सोबत शेकडो नागपूरकरांनी योगासने केली. यावेळी योगअभ्यासाच्या क्षेत्रात तरुणांनी भविष्य घडवण्याचे आवाहन धनश्रीने केले. निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाने नियमित योगासने करावे असा सल्ला ज्योती आमगे यांनी दिला.