नागपूर- भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अग्निशमन आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन हे दोन क्षेत्र सदैव दुर्लक्षित राहिल्याची कबुली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी दिली आहे. गृहमंत्री शहा आज नागपुरात नव्याने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.
केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार अस्तित्वात आल्यापासून या दोन्ही क्षेत्रांचा विकास करण्यासाठी प्रयत्न होत आहे. मात्र, अग्निशमन विभाग हा राज्य सरकारांचा विषय असल्याने त्याच्या विकासात अनेक मर्यादा येत असल्याचे अमित शाह म्हणाले. अग्निशमन आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन हे दोन्ही विभाग एकमेकांशी संबंधित आहेत. मात्र, आजपर्यंत या विभागांना सक्षम करण्यासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत, असा दावा करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढले.
शाहा म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात सुरू झालेल्या राष्ट्रीय प्रकल्पांसाठी पाहिले सरकार योजना आखत असायची. तर, दुसरे सरकार त्याला निधी उपलब्ध करवून द्यायचे आणि तिसरेच सरकार त्या प्रकल्पाचे उद्घाटन करत असे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये तसे होत नाही. आम्ही सुरू केलेले काम निर्धारित वेळेत पूर्ण करून त्याचे लोकार्पण देखील आम्हीच करत असल्याचा दावा करत अमित शाह यांनी काँग्रेस सरकारच्या कामावर प्रहार केला.
२०१६ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी या दोन्ही विषयाला गती देण्याचे काम केले आहे. ज्यामुळे आज ४ वर्षातच आपल्या देशाने जगातील सर्वात उत्कृष्ट नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करणारे पथके तयार केल्याचा दावा केला आहे. या करिता त्यांनी नेपाळ येथील नैसर्गिक आपत्तीच्या वेळी भारताच्या एनडीआरएफने केलेल्या कामाचा दाखला दिला.
हेही वाचा- 'मेरीटमध्ये आलेला विद्यार्थी वर्गाबाहेर अन् ४० टक्के घेणारे तिघे वर्गात'