नागपूर : कुंपणाने शेत खाल्ले या वाक्य प्रचाराला अगदी साजेशी घटना नागपूर शहरातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. त्याचे झाले असे की, एका विवाहित महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याच्या घरात डल्ला मारला. यात तब्बल १४ लाख रुपये किमतीचे सोने लंपास केल्याचे समोर आले आहे. शिवानी सुमित यादव असे विवाहित महिला आरोपीचे नाव आहे. तर रजत आणि हर्ष असे तिला चोरी करण्यात सहकार्य करणाऱ्या आरोपींचे नाव असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
मित्राचा मदतीने केली चोरी : गेल्या महिन्यात ३० जून रोजी सुमित यादवच्या घरी चोरी झाली होती. या घटेनची तक्रार सदर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी सुमारे महिनाभर चोरीच्या घटनेचा सखोल तपास केला तेव्हा अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे. सुमित यादवच्या घरात चोरी दुसऱ्या तिसऱ्या आरोपीने केलेली नसून त्यांच्याच पत्नीने प्रियकर व त्याच्या मित्राचा मदतीने केल्याचा खुलासा झाला आहे.
सीसीटीव्हीमुळे मिळाला सुगावा : नागपूर शहरातील सदर पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या सुमित यादव यांच्याकडे ३० जूनला दुपारी चोरी झाली. चोरट्यांनी सोने व चांदीच्या दागिन्यासह तब्बल १४ लाखाचा मुद्देमाल चोरी केला. यामध्ये ६ लाख ७५ हजार रोख रक्कम आणि १४ तोळे वजनाचे गोल्ड ब्रेसलेटसह इतर महागड्या वस्तू चोरल्या होत्या. पोलिसांनी चोरीच्या घटनेचा तपास सुरू केला असता, सर्वप्रथम घराच्या आवारातील सर्व सीसीटीव्ही तपासले तेव्हा पोलिसांना आरोपींचा सुगावा लागला.
शिवानीचे अखेर बिंग फुटले : फिर्यादी सुमित यादवच्या पत्नीचे वर्तन अगदी संशयास्पद असल्यामुळे पोलिसांना तिच्यावर संशय आला होता. मात्र, तिच्या विरोधात एकही पुरावा नसल्याने पोलिसांनी अनेक दिवस तिला अटक केली नाही. मात्र ज्यावेळी पोलिसांनी तिची कसून चौकशी केली तेव्हा शिवानी यादव हिने गुन्हा कबूल केला. प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने घरात चोरी केल्याची कबुली तिने दिली आहे. चोरी करण्यापूर्वी घरात कुठली वस्तू कुठे ठेवण्यात आली आहे, याची इत्यंभूत माहिती तिने प्रियकरायला दिली होती.
नवरा बायकोचे तणावपूर्ण संबंध : काही महिन्यांपूर्वी फिर्यादी सुमित यादव यांना अपघात झाला होता. त्यामुळे त्यांना शारीरिक त्रास असल्याने नवरा बायकोमध्ये तणावपूर्ण संबंध तयार झाले. त्यातूनच आरोपी शिवानी यादव हिने नवऱ्याच्या घरात डल्ला मारण्याची योजना तयार केल्याचे तपासात उघड झाले आहे.