नागपूर - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. पहिल्या टप्यातील लॉकडाऊन 14 एप्रिलला संपेल आणि नियोजित लग्न समारंभ पार पडतील, असे सर्व उत्साही वर आणि वधु पक्षांकडील मंडळीना वाटत होते. मात्र, कोरोनाची पकड आणखी घट्ट झाल्याने लॉकडाऊनचा कार्यकाळ 3 मे पर्यंत वाढवण्यात आला. त्यामुळे एप्रिल महिन्यातील बहुतांश लग्न समारंभ पुढे ढकलण्यात आले आहेत. मात्र, ज्यांच्याकडे लग्न रद्द किंवा पुढे ढकलण्यासंदर्भात फारसे पर्याय उपल्बध नाहीत, असे लग्न सोहळे केवळ पाच ते दहा वऱ्हाडींच्या उपस्थित पार पडत आहेत.
नागपूरच्या बाबा ताज कॉलनीमधील मोहसीन काझी यांचा निकाह नसरीन शेख सोबत 5 एप्रिलला आयोजित करण्यात आला होता. मात्र, देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने विवाहाची तयारी तशीच राहिली. 14 एप्रिलला लॉक डाऊन संपल्यानंतर विवाह करण्याचे ठरले. लॉकडाऊनची मुदत 3 मे पर्यंत करण्यात आल्याने काझी आणि शेख कुटुंबीयांनी विवाह साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला. २१ एप्रिलला मोहसीन आणि नसरीन यांचा विवाह घरीच मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साधेपणाने पार पडला. तसेच लग्न आणि स्वागत समारंभावर येणारा खर्च गरिबांच्या भोजनासाठी देण्यात आला.