नागपूर - भाजप आणि शिवसेना एकत्रपणे निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात असताना भाजपने सर्व 288 जागांसाठी तयारी सुरू केली असल्याच्या वृत्ताला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षरित्या येथे दुजोरा दिला. तर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता गणेश विसर्जनानंतर केव्हाही लागू शकते, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
राज्यातील विधासभेच्या 288 जागांवर भाजपचे निरीक्षक गेले आहेत. ते उमेदवार जिंकण्याच्या संभावनांची चाचपणी करत आहेत. यासोबतच कोणती जागा शिवसेनेला देता येईल, याचा देखील ते अभ्यास करत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या भाजपतर्फे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच जागांवर उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत, यावर बोलताना युतीच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे आणि अमित शहा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यात गणपती उत्सवानंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचेही भाकीत मुनगंटीवार यांनी वर्तवले.