नागपूर - शहरात सध्या पाणी प्रश्न पेटला असताना त्याचा फटका आता अनेक घटकांना बसताना दिसत आहे. शहरात पाणीबाणी निर्माण झाल्याने नागपूरमार्गे इतरत्र जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना पाणी न देण्याचा निर्णय झाला आहे. म्हणजेच नागपूर स्टेशनवर बाहेरून येणाऱ्या गाड्यांमध्ये आता नागपुरात पाणी भरले जाणार नाही, हे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे 70 ते 80 गाड्यांना याचा फटका बसणार आहे.
नागपूर हे देशाचे महत्तवाचे शहर आहे. नागपूर रेल्वे स्थानकावरून चारही दिशेला रेल्वे मार्ग जातो. त्यामुळे येथे रेल्वेची आवाक-जावक मोठी आहे. नागपूर स्टेशनवरून सुटणाऱ्या गाड्या सोडता बाहेरून लांब मार्गाच्या 70 ते 80 गाड्या दररोज येथून धावतात. त्या गाड्यांमध्ये नागपूर स्टेशनवरून पाणी भरले जायचे मात्र, नागपुरात निर्माण झालेली भीषण पाणी टंचाई बघता संपूर्ण शहरात आठवड्यात तीन दिवसच पाणीपुरवठा केला जातो. पाणी टंचाईमुळे हे नियम रेल्वेसह सर्वच घटकांना लागू झाल्याने रेल्वे स्टेशनवर पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानेसुद्धा पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. नागपूरमधून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये पाणी भरले जाणार आहे. मात्र, बाहेरून येणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये पाणी नागपुरातून भरले जाणार नाही. नागपूर रेल्वे स्थानकातून दिवसाला लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे पिण्यासाठी लागणारे पाणी आणि इतर पाणी बघता जवळपास 5 लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, वापरण्याच्या पाण्यात कपात करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. रेल्वे गाड्या धुण्यासाठी लागणारे पाणी आधीपासूनच रिसायकल केलेले पाणी वापरले जाते. त्यामुळे ती समस्या नाही.