नागपूर - अर्धा पावसाळा संपला असला तरी नागपूर विभागातील धरणात फक्त १० टक्के पाणीसाठा जमा झालेला आहे. तर विदर्भातील पाच मोठ्या धरणात शुन्य टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात दीड महिना पावसाविना गेला. निम्मा पावसाळा संपला तरीही विदर्भातील धरणांमध्ये अवघे ९.५ टक्केच पाणीसाठा जमा झाला आहे. ४ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. मात्र, विदर्भातील पाच मोठ्या धरणांमध्ये एकही टक्का जमा झालेले नाही.
नागपूर विभागातील लघू, मध्यम आणि मोठ्या धरणात अवघा १० टक्केच पाणीसाठा आहे, परिस्थिती अशीच राहिली तर विदर्भात शेतीला पाणी मिळणे कठीण होईल, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नागपूरकरांची भिस्त असलेल्या तोतलाडोह धरणात सध्या शुन्य टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अशीच परिस्थिती राहिली तर नागपूर शहराला गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.