नागपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशातील उद्योग, व्यापार प्रभावित झाले आहेत, तर कोरोनाची झळ कृषी क्षेत्रालाही बसलेली आहे. बाजारात ग्राहक नसल्याने शेतमाल राज्य सरकारच्या वखार महामंडळातील गोडाऊनमध्ये पडलेला आहे. अशात सध्या खरिपाचा हंगाम सुरू झालेला असल्याने येत्या दोन महिन्यात पीक कापणीला येणार आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडे धान्यांची साठवणूक करण्यासाठी पुरेसे गोदामे आहेत का? याचा आढावा घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
नागपूर विभागात सहा जिल्हे येतात. यामध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे. नागपूर विभागातील सर्व सहा जिल्ह्यांमध्ये वखार महामंडळाचे गोदामे असून यामध्ये दोन लाख १७ हजार मेट्रीक टन धान्य साठवणूक करण्याची क्षमता आहे, तर एकट्या नागपुरात ३० हजार १५० मेट्रीक टन क्षमतेची गोदामे उपलब्ध आहेत. नागपूर विभागातील गोदामांमध्ये ९६ टक्के अन्नधान्य आणि कापसाच्या गाठी भरलेल्या आहेत. केवळ सहा टक्केच क्षमता शिल्लक आहे, तर नागपूर जिल्ह्यातील १७ गोदामे मात्र शंभर टक्के भरलेले आहेत. सध्या गोदामांमध्ये सव्वा तीन लाख कापसाच्या गाठी ठेवण्यात आल्या आहेत, तर ६० हजार मेट्रीक टन चणा सुद्धा साठवून ठेवण्यात आला असल्याची माहिती वखार महामंडळाचे महाव्यवस्थापक एस. पी. बोरखे यांनी दिली आहे.
भारताची अर्थव्यवस्था शेतीप्रधान असून देशाची 165.7 लाख हेक्टर जमिन ही लागवडीखाली येते. त्यातून 426.71 लाख मेट्रीक टन अन्नधान्य, डाळी, तेलबिया, कापूस, ज्युट, ऊस इत्यादी पिकांचे उत्पादन होते. अन्नधान्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यातल्या त्यात शेतकऱ्यांजवळ साठवणूक क्षमता नाही. तसेच शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज असल्याने माल काढणीनंतर लगेच बाजारामध्ये विकण्यासाठी नेतो. पीक हंगामामध्ये अन्नधान्न्याचे बाजारभाव पडत असल्याने त्याच्या मालाला योग्य ती किंमत देखील मिळत नाही. लवकर खरिपाचे पीक कापणीला येणार आहे. मात्र, त्याआधी गोदामातील धान्न्याची निर्यात सुरू होऊन खरिपाच्या पिकांना जागा उपलब्ध होणार, अशी माहिती वखार महामंडळाचे महाव्यवस्थापक एस. पी. बोरखे यांनी दिली आहे. भविष्यातील गरज लक्षात घेता नागपूर विभागातील सावनेर, वर्धा आणि बुटीबोरी येथे नवीन गोदाम तयार करण्याचा प्रस्ताव आहे, तर इतर गोदामांची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती देखील बोरखे यांनी दिली आहे.