रामटेक (नागपूर) - रामटेक तालूक्यातील शिवनी भोंडकी येथील एका शेतात असलेल्या 50 फूट खोल उघड्या बोरवेलमध्ये दोन वर्षांचा चिमुकला पडला होता. घेटनेचे प्रसंगावधान राखत गावकऱ्यांनी त्या बाळास मोठ्या शिताफीने सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे. नवघान देवा दोंडा (वय 2 वर्षे), असे त्या बाळाचे नाव आहे. ज्या बोरवेलमध्ये तो चिमुकला पडला होता. त्या बोरवेलमध्ये ग्रामस्थांनी एक दोर सोडला, तो दोर त्या चिमुकल्याच्यापर्यंत गेल्यानंतर त्याने तो दोर घट्ट पकडताच ग्रामस्थांनी दोर बाहेर ओढला. नवघान हा चिमुकला अलगद आणि सुखरूप बाहेर आला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिल्हा प्रशासनाची मदत पोहचण्यापूर्वी चिमुकला बाहेर आला हे विशेष.
नवघानचे वडील शिवारात जनावरे चारत होते. त्याबरोबरच त्याचे मुलं देखील खेळत होते. खेळता खेळता शेतातील एका उघड्या बोरवेलच्या खड्ड्यात नवघान पडला. इतर मुले रडत होती. मुलांचा रडण्याचा आवाज ऐकून त्याचे वडील घटनास्थळी धावले. आई-वडिलांचा हंबरडा ऐकून गावातील लोक घटनास्थळी दाखल झाले. जवळपास अर्धा तासापासून तो बाळ पडून होता. गावातील अपघातग्रस्त रक्षक कृष्णा पाटील, यादोराव शेंडे, शंकर शेंडे, महादेव पाटील, अमोल वैद्य, अक्षय गभणे तसेच गावातील नागरिक यांनी घटनास्थळावर धाव घेतली. बोरवेलला पाणी न लागल्याने शेतकऱ्याने तो खड्डा तसाच उघडा ठेवला होता. बाळास बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. टॉर्च लावून बाळाशी संपर्क साधला. पन्नास फूट खोल असलेल्या बोरवेलच्या खड्ड्यात दोरी टाकली. बाळास दोरीला घट्ट पकडण्यास सांगितले. त्या चिमुकल्यानेही सूचनांचे तंतोतंत पालन केले. ज्यामुळे ग्रामस्थांनी अवघ्या काही वेळातच मोठ्या शिताफीने बाळास सुखरूप बाहेर काढले.
प्रशासनाला कल्पना देखील नाही
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या घटनेची माहितीही प्रशासनापर्यंत पोचण्याआधीच ग्रामस्थांनी त्या चिमुकल्याला सुखरूप बोरवेलमधून बाहेर काढले. अपघातग्रस्त रक्षक कृष्णा पाटील यांनी सांगितले की, आजपर्यत आम्ही फक्त टी.व्ही.वरच असे पाहत आलो. पण, आज प्रत्यक्षात असे अनुभव अनुभवायलाही मिळाले. जिद्द आणि चिकाटी असेल तर यमराज ही प्राण घेऊ शकत नाही म्हणून "देव तारी त्याला कोण मारी" या म्हणीचा परिसरातील नागरिकांना अनुभव पहायला मिळाला.
हेही वाचा - नागपुरात धोकादायक इमराती दीडशे पार, महापालिकेने बजावली नोटीस