नागपूर- राज्यात भाजपची सत्ता आणि नागपूरचे मुख्यमंत्री असताना विदर्भात अनेक प्रकल्पांना चालना मिळाली होती. मात्र, आता सत्ता परिवर्तन झाल्याने त्याचा फटका विदर्भातील प्रकल्पांना बसणार अशी चर्चा आहे. विकास कामांना खीळ बसण्याच्या मुद्यावरून आता राजकारण देखील सुरू झाले आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये विदर्भावर पुन्हा अन्याय होईल की विकासाची गती कायम राहील याबाबत विदर्भातील जनतेत साशंकता आहे.
नागपुरातील मिहान प्रकल्प भाजप सरकारच्या काळात चांगलाच चर्चेत आला होता. या ठिकाणी अनेक देश-विदेशातील उद्योग आले. काहींची कामे सुरू झाली तर काही प्राथमिक अवस्थेत आहे. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ नूतनीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, गोरेवाडा प्राणी संग्रहालय, सिंधी येथील ड्राय पोर्ट, नागपूर मेट्रो, कार्गो हब, गोसेखुर्द डॅम, अजनी इंटरमॉडेल ट्रान्सपोर्ट हब, टेक्स्टाईल पार्क असे प्रकल्प विदर्भात गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आले. नागपुरतील मुख्यमंत्री कार्यालय देखील गुंडाळण्याची चर्चा आहे. या सगळ्या प्रकल्पांमुळे विदर्भातील जनतेच्या विकासाप्रती अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. मात्र, महाआघाडीची सरकार आल्यामुळे या सगळ्या कामांना आळा तर बसणार नाही ना याबाबत जनतेमध्ये साशंकता निर्माण झाल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
विदर्भाचा विकास खुंटला, विदर्भाचा अनुशेष वाढला अशी ओरड काँग्रेसच्या काळात होत होती. मात्र, मागच्या ५ वर्षात विदर्भाला मुख्यमंत्री मिळाला आणि अनेक क्षेत्रात निधी आला. त्यामुळे, विदर्भातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या असल्या तरी शेती सारख्या विदर्भातील महत्वाच्या प्रश्नावर मात्र त्यांना पाहिजे तसे यश मिळाले नाही. आणि कदाचित त्याचाच परिणाम की काय भाजपला विदर्भात कमी जागा मिळाल्या आणि सत्तेपासून दूर जावे लागले. आता काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता आली पण शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पाहिजे तसे अस्तित्व विदर्भात नाही. त्यामुळे, या सगळ्या विकास कामांची जबाबदारी घेऊन काँग्रेसपुढे येईल का हा प्रश्न असला तरी विदर्भाच्या विकासाप्रती हे सरकार कटिबद्ध असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी सांगितले.
काँग्रेसचे नेते सुद्धा मानतात की भाजपच्या सरकारमध्ये विदर्भाचा मुख्यमंत्री असल्याने जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. आणि त्या आता पूर्ण होईल का असा प्रश्न जनतेच्या मनात आहे. मात्र, सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारला विदर्भाचा विकास करावाच लागेल. नाहीतर जनता त्यांना सुद्धा त्यांचे स्थान दाखवेल असे मत काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी मांडले.
हेही वाचा- नागपुरातील 'देवगिरी' जयंत पाटील, की अजित पवारांचे करणार स्वागत?