नागपूर - गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भवादी संघटना एकत्र येऊन 1 मे रोजी स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकवतात. तसेच हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र, यंदा कोरोनामुळे विदर्भवाद्यांनी सर्व कार्यक्रम रद्द करून ऑनलाईन विचार मंथनाचा कार्यक्रम आयोजित केला. यामध्ये आज स्वतंत्र विदर्भवादी नेते व कार्यकर्ते ऑनलाईन एकत्र आले. तसेच स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर चर्चासत्र घेण्यात आले.
श्रीहरी अणे, वामनराव चटप, श्रीनिवास खांदेवाले यांच्यासह अनेक नेते या ऑनलाईन विचारमंथन कार्यक्रमात सहभागी झाले. ऑनलाईन आयोजन असल्याने देश विदेशातील विदर्भवादी पहिल्यांदाच यात सहभागी झाले होते. दरवर्षी आजच्या दिवशी स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकविण्यात येतो. रॅली काढण्यात येते. मात्र, यंदा कोरोनामुळे अशा कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नाही. प्रशासन व पोलिसांवर कुठलाही ताण येऊ नये म्हणून विदर्भावाद्यांनी सर्व कार्यक्रमांना फाटा देत ऑनलाईन मंचावर एकत्र आले आणि स्वतंत्र विदर्भाचा आवाज बुलंद करण्याचा निर्धार केला.