नागपूर - शहरातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगळवारी भाजी बाजारात चार भावांनी संगनमत करून एका भाजी विक्रेत्याचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. अक्षय किशोर निर्मले ( वय २३) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी भाजी बाजारात वर्चस्व निर्माण करण्याच्या वादातून चार भावंडांनी अक्षयचा खून केल्याची माहिती पुढे आली आहे. ज्यावेळी ही घटना घडली आहे, त्यावेळी शेकडो लोक भाजी घेण्यासाठी बाजारात आले होते. त्यांच्या समक्ष खुनाचा थरार घडला आहे.
या प्रकरणी सदर पोलिसांनी निखिल वर्मा, राजू वर्मा, रितेश वर्मा आणी सुमित वर्मा या चार आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरू केला आहे. घटना काल मंगळवार रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेतील मृत अक्षय निर्मल हा काही महिन्यांपूर्वी कारागृहात बाहेर आला होता. त्यानंतर त्याने मंगळवारी बाजारात भाजीचे दुकान सुरू केले होते. याच बाजारात वर्मा बंधू आपली दहशत निर्माण करत असल्याने अक्षय आणि त्यांच्यात खटके उडायला सुरवात झाली होती.
दरम्यान काही दिवसांपूर्वी या बाजारातील एका भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या ओट्यावर या दोघांची नजर होती. त्यातच काल रात्री निखिल वर्मा, राजू वर्मा, रितेश वर्मा आणि सुमित वर्मा यांनी जाणीवपूर्वक चहाची गाडी (ठेला) अक्षयच्या दुकानासमोर उभी केली. यामुळे यांच्यात वादावादी झाली. काही वेळात ज्यावेळी अक्षय आपल्या कामात व्यस्त झाला होता त्यावेळी चारही जणांनी संगनमत करून धारधार शस्त्राने अक्षयवर वार केले. यात अक्षय गंभीर जखम झाला. अक्षयला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सदर पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीं विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
१२ दिवसात ८ खून...मालिका केव्हा थांबणार
वर्षाच्या सुरवातीच्या केवळ ११ दिवसांमध्येच ७ (एकाचा पोस्टमार्टेम अहवाल येणे बाकी) खुनाच्या घटना घडल्यानंतर उपराजधानी नागपूरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्न ऐरणीवर आला असताना पुन्हा एक खुनाची घटना घडली आहे. त्यात आणखी एका खुनाची घटना घडल्याने हा आकडा ८ झाला आहे. गृहमंत्री असलेले अनिल देशमुख यांच्याच शहरातील गुंडांमध्ये पोलिसांची भीती राहिलेली नाही का? असा संतप्त सवाल नागरिकामधून व्यक्त केला जात आहे.