नागपूर - नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. गुरूवारी आणि शुक्रवारी अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. मागील दोन दिवसात झालेल्या पावसाने तापमानात घट झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. साधारण 39 अंशाचा घरात असणाऱ्या तापमानात 8 ते 9 अंशांनी घसरण झाली आहे. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळाला आहे.
शेतकरी चिंतेत -
वातावरणात झालेल्या बदलामुळे हवामान खात्याने 18 मार्च ते 21 मार्च दरम्यान पावसाची शक्यता वर्तवली होती. दिवसभर ढगाळ वातावरण राहत असून रात्रीला जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. सायक्लोनिक सर्क्युलेशन निर्माण झाल्याने काही भागात पाऊस कोसळत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी मात्र, पुन्हा चिंतेत आहेत. काही ठिकाणी शेतात काढून ठेवलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
वर्ध्यातही दोन दिवस पाऊस आणि पिकांचे नुकसान -
वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागात रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील देवळी, वर्धा, आर्वी, कारंजा, हिंगणघाट तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहे. विजांच्या कडकडाटासह अर्धा तास पाऊस झाला. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावलेली आहे. रात्रीच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित झाला होता. विदर्भात पाच दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती.
हेही वाचा - सचिन वाझेंना अँटिलियाजवळ नेत एनआयएने केले गुन्ह्याचे नाट्य रुपांतर