नागपूर - योगगुरू रामदेव बाबा दिल्लीजवळ योग विद्यापीठ सुरू करणार आहेत. त्या प्रमाणेच नागपूरमध्येसुद्धा योगगुरू जनार्दन स्वामी यांच्या नावाने योग विद्यापीठ सुरू व्हावे, अशी इच्छा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. ते नागपूरच्या राम नगर येथील जनार्धन स्वामी योग अभ्यासी मंडळात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
जगात आयुर्वेद आणि योगासंदर्भात प्रचंड आकर्षण आहे. आयुर्वेद आणि योग आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक असले, तरी भारतात योग शिकवणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी आहे. त्यामुळे देशात योग शिकवणारे विद्यापीठ सुरू केल्यास भविष्यात हजारो योग गुरू तयार होतील आणि ते योग गुरू देशात आणि विदेशात योगासनांचे धडे देतील. तसेच यातून चांगला पगार कमावू शकतील, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी रामदेव बाबा मला मानसपुत्र मानत असल्याचे सांगितले. रामदेव बाबा यांनीदेखील योगाच्या प्रचार आणि प्रसाराकरिता आपले जीवन वेचले असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.