नागपूर : पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या निधनामुळे देशात दुखवटा पाळला जातो आहे. त्यामुळे कोणत्याही उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणे योग्य नाही. त्यामुळे अमित शाह यांचा दौरा रद्द करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. आज सरसंघचालक मोहन भागवत, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा उदघाटन सोहळा पार पडणार होता. मात्र,आता अमित शाह यांचा दौरा रद्द झाल्यानंतर उर्वरित मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा उद्घाटन सोहळा : डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्था संचालित नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा उद्घाटन सोहळा आज आयोजित करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस या संस्थेचे मुख्य संरक्षक आहेत. उद्घाटन सोहळ्याला गृहमंत्री येणार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारीच नागपूरात दाखल झाले होते. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर शहा यांचा हा चौथा महाराष्ट्र दौरा होणार होता.
सत्तासंघर्षावर तीन नेत्यांची बैठक टळली : सत्तासंघर्षाच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्रसह देशाचे लक्ष लागलेले आहे. मुख्यमंत्र्यांसह १६ आमदारांचे पुढील राजकीय भविष्य ठरवणार पात्र-अपात्रतेचा निकालाचा जोगवा कोणाच्या पारड्यात पडतो. यावर भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढील दिशा कशी असेल हे निश्चित होणार आहे. सत्तेचा संघर्ष अगदी शेवटच्या वळणावर आला असताना सर्वांचीच धाकधूक वाढलेला आहे. अश्या परिस्थितीत भाजपचे चाणक्य अमित शाह, भाजचे गेम- चेंजर नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नागपुरात भेट होणार होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रात्रीच नागपूरला दाखल झाल्यानंतर गृहमंत्री अमित शाह रात्री उशिरा नागपुरला येणार होते. मात्र, त्यांचा सुनियोजित कार्यक्रम रद्द झाल्यामुळे तीनही नेत्यांची बैठक देखील टळली आहे. तीनही नेते नागपूरला येण्यामागे मोठे राजकीय संकेत मिळत होते.