नागपूर : हत्येचा प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला पुन्हा एकदा न्यायालयाने पॅरोल मंजूर केला आहे. गेल्या महिन्यातच तो पॅरोल पूर्ण करून नागपूर कारागृहात परतला होता. त्यावेळी सुद्धा गवळीच्या पॅरोलला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र तिसऱ्यांदा पॅरोलला मुदतवाढ मिळावी या करिता त्याने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तेव्हा न्यायालयाने गवळीचा अर्ज नामंजूर केल्याने तो जून महिन्याच्या सुरुवातीला नागपूर मध्यवर्ती कारागृहात परत आला होता. आता पुन्हा त्याने पॅरोलसाठी न्यायालयात अर्ज केला तेव्हा न्यायालयाने त्याचा अर्ज मंजूर करत २८ दिवसांची रजा दिली आहे.
30 नोव्हेंबर 2019 ला गवळीने तुरुंग प्रशासनाकडे अर्ज दाखल केला होता. परंतु 7 महिन्यांचा कालावधी उलटूनही त्याचा अर्जावर सुनावणी झाली नाही. सोबतच अरुण गवळी हा यापूर्वी 8 वेळा कारागृहातून बाहेर आला. परंतु, दिलेल्या मुदतीत त्याने कुठल्याही नियमांचा भंग केला नाही व दिलेल्या कालावधीत तो तुरुंगात हजर झाल्याचा युक्तिवाद गवळीच्या वकिलांनी केला. वकिलाचा युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने गवळीला 28 दिवसांची पॅरोल रजा मंजूर केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे अरुण गवळीचा पॅरोल एकदा वाढवण्यात देखील आला होता.
याप्रकरणी मंगळवारी न्यायाधिश झेड.ए हक आणि न्यायाधिश एन.बी. सुर्यवंशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने प्रकरणातील विविध मुद्दे लक्षात घेत गवळीची संचीत रजा मंजूर केली आहे. मुंबईतील शिवसेना नेत्याच्या हत्येच्या आरोपात अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. दरम्यान, मुंबईतील शिवसेना नेत्याच्या हत्येच्या आरोपात अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.