नागपूर: आमच्यासाठी सत्ता हे साध्य नाही तर जनकल्याणाचे आणि अंत्योदयाचे साधन आहे असे सांगून बावनकुळे म्हणाले, तिन्ही पक्षांचा विचार महाराष्ट्राचा सत्यानाश करत आहे. महाविकास आघाडीच्या सभामंध्ये एक नेता बोलताना इतर तीन लोक वेगळेच बोलतात. अर्धी गर्दी कार्यक्रम सोडून निघून जाते. उद्धव ठाकरेंचे भाषण सुरू असताना ५० टक्के लोक निघून गेले होते, असे निरीक्षण बावबकुळेंनी नोंदविले.
अजित पवारांच्या भूमिकेबद्दल माहिती नाही: अजित पवार हे भाजपात येणार अशी चर्चा आहे. याविषयी काही हालचाली सुरू आहेत का? या प्रश्नावर उत्तर देताना आपल्याला काहीच माहित नसल्याचे बावनकुळेंनी सांगितले. चर्चा खूप होत असतात. जर-तरला राजकीय जीवनात अर्थ नाही. आमचा हा महिना प्रवेशाचा आहे. 25 लक्ष प्रवेश करून घेणे हेच आमचे लक्ष्य आहे. बूथवर काम करणाऱ्यांचा प्रवेश सुरू आहे. पक्षामध्ये कोणीही आले तरी स्वागतच आहे. भाजपच्या विचारधारेवर काम करणे मान्य असणाऱ्यांचे स्वागत आहे, असेही बावनकुळे म्हणाले.
मृत्यूचे कुणीही राजकारण करू नये: आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या 'महाराष्ट्र भूषण' कार्यक्रमावर विरोधकांना राजकारण करायचे आहे. कार्यक्रमाला आलेल्या काही प्रेक्षकांची प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याची घटना दु:खद आहे. कुणामुळे काय झाले याला कोणताच अर्थ नाही. मृतांना काय मदत करता येईल, हे महत्वाचे आहे.
विरोधकांत एकजुट होणार नाही: भाजपच्या विविध राज्यातील सरकारांचे काम, डबल इंजिन सरकारांचे काम हे जनतेला पटले आहे. विरोधकांनी कितीही मोट बांधल्या तरी पंतप्रधान मोदींना भारताला सर्वश्रेष्ठ करण्यापासून आणि लोकसभेत ४०० प्लस जागा जिंकण्यापासून रोखू शकत नाही. आम्ही कामावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. तोंडाने वाफा फेकत नाही. विरोधकांत एकजुट होत नसल्याची टीकाही बावनकुळेंनी केली.
फडतूस कोण हे सिद्ध झाले: उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर येथे फडतूस असा पुनरुच्चार केला. यावर बावनकुळे म्हणाले की, कुटुंबप्रमुख फडतूस असतो, तेव्हा घराचे वासे फिरतात. म्हणूनच 40 जिगरी सहकारी ठाकरेंना सोडून गेले. त्यावरून फडतूस कोण हे आपोआप सिद्ध होते. वारंवार स्वतः बद्दल ते बोलत आहेत. उद्धव ठाकरेंच्या नागपूरातील भाषणादरम्यान खुर्च्या रिकाम्या होत्या. यातून त्यांचाच फडतूसपणा सिद्ध होतो.
राम मंदिराचा विषय समोपचाराने मार्गी लावला: राम मंदिर हा विषय काँग्रेसने चिघळत ठेवला; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तो लोकशाहीच्या मार्गाने निकाली काढल्याचे बावनकुळे म्हणाले. श्रीरामप्रभू हे राष्ट्रपुरुष आहेत. काँग्रेसच्या घाणेरड्या राजकारणाने दोन धर्मात तेढ निर्माण झाले. हे वास्तव उद्धव ठाकरे विसरतात का? मोदींनी सामोपचाराने हा विषय मार्गी लावला.
नितीन देशमुखांचा बोलविता धनी कोण? आमदार नितीन देशमुख यांनी केलेल्या दर्जाहीन टीकेवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, एका आमदाराने अशी टीका करणे योग्य नाही. नितीन देशमुखांचा बोलविता धनी कोण हे सर्वांना माहीत आहे असून येणाऱ्या निवडणुकीत बाळापूर मतदारसंघातील जागरूक नागरिक या आमदारांचा योग्य उपचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.