नागपूर - पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यात आज कॉलर असलेल्या वाघिणीसह तिचे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली आहे. या शिवाय त्या ठिकाणीएका गाईच्या वासराचा अर्धवट खालालेला मृतदेह आढळून आला आहे. विषबाधेमुळे वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. या प्रकरणी एका शेतमालकाला अटक करण्यात आली आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एकाचवेळी वाघिण व बछडे मृतावस्थेत आढळल्याने वनविभागाचे धाबे दणाणले आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. पेंच वनविभागाने घटनास्थळी श्वान पथकाला देखील पाचारण केले होते. वाघीण आणि तिच्या शावकांच्या मृतदेहांचं उद्या शवविच्छेदन केले जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
दीड महिन्यांपूर्वी देखील झाला दोन वाघांचा मृत्यू -
उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात दीड महिन्यापूर्वीच दोन वाघांचा बळी गेला होता. वाघांच्या झुंजीत त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, यावेळी विषप्रयोगाने वाघिणीसह तिच्या दोन बछड्यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळ वळण मिळाल आहे.