नागपूर - चार दिवसांपूर्वी नागपुरात विलागीकरण कक्षात असलेल्या नागरिकांनी निकृष्ट दर्जाच्या जेवणाच्या विषयावरून जोरदार गोंधळ घातला होता. त्यानंतर आता विलगीकरण केंद्रातील नागरिकांची काळजी नागपूर महानगरपालिका जबाबदारीने घेत असल्याचा दावा करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या संदर्भात एक व्हिडिओसुद्धा प्रसारित केला आहे. ज्यामध्ये सर्व विलगीकरण केंद्रातील नागरिकांना सात्विक आहार पुरविला जात असल्याचे दाखवले आहे.
विलगीकरण केंद्रातील नागरिकांची काळजी ही मनपाची जबाबदारी आहे. त्यांना देण्यात येणाऱ्या भोजनाबद्दल कुणी शंका घेण्याचे कारण नाही, अशी व्यवस्था आहे. राधास्वामी सत्संग ब्यास ही एक सेवाभावी संस्था असून येथील प्रत्येक सेवाकरी समर्पणाची भावना ठेवून कार्य करतात. तेथील स्वच्छता चोख अशी आहे. विलगीकरण केंद्रातील नागरिकांनी प्रशासनावर विश्वास ठेवून सहकार्य करावे, तेथील सुविधांबाबत वेळोवेळी अधिकाऱ्यांमार्फत आवश्यक पर्यवेक्षण केले जात आहे. त्यामुळेअफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या आणि प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना विलगीकरण केंद्रात ठेवले जाते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार त्यांची व्यवस्था करण्यासोबतच त्यांना त्रास होऊ नये, याचीही पुरेपूर काळजी घेतली जाते. सध्या नागपुरात 11 विलगीकरण केंद्र असून त्याची क्षमता तीन हजारांवर आहे. भविष्यातील व्यवस्था म्हणून राधास्वामी सत्संग कळमेश्वर रोड येथे सुमारे पाच हजार क्षमतेचे 'कोव्हिड केअर सेंटर' उभारण्यात आले आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या 11 विलगीकरण केंद्रात नागपुरातील विविध प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक असून त्यांना आता जे सात्विक भोजन पुरविले जाते. हे भोजन कळमेश्वर मार्गावरील राधास्वामी सत्संग ब्यास येथील स्वयंपाकगृहात तयार केले जात असल्याचा दावा मुंढे यांनी केला आहे.
हेही वाचा - नागपूरात सहा नवीन रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू