नागपूर - महानगर पालिकेची विशेष सभा आज बोलावण्यात आली होती. मात्र नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूर महानगर पालिकेचे पदभार स्वीकारलेला नाही. तसेच वर्तमान आयुक्त अभिजित बांगर यांनी सभेला दांडी मारली. यामुळे अखेर सभा रद्द करावी लागली.
राज्यभरात शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे आज नागपूर महानगर पालिकेचा पदभार घेणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. तसेच त्यांची आज पहिलीच विशेष सभा असल्याने, या सभेत काय धडाकेबाज निर्णय घेणार यांची उत्सुकता होती. पण त्यांनी आज पदभार स्वीकारला नाही आणि आजची मनपाची सभा स्थगित करावी लागली.
दरम्यान, नागपूर मनपा आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्तीच्या निर्णयाचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल गुढेन यांनी स्वागत केले आहे. तसेच त्यांनी मुंढे यांना कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावं लागेल, असा सूचक इशाराही दिला आहे.
राज्य सरकारने २१ जानेवारीला २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या अधिकाऱ्यांमध्ये तुकाराम मुंढे यांच्या नावाचाही समावेश असून राज्य सरकारने त्यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली केली आहे. ते एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर होते.
हेही वाचा - कोरेगाव-भीमा प्रकरणातील काही गुन्हे मागे घेणार - अनिल देशमुख
हेही वाचा - 'राज्य सरकारचे 'रिमोट सिल्वर ओक'वर, त्याची 'बॅटरी' दिल्लीत'