नागपूर - भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली मंगळवारी नागपूर महापालिका आयुक्तपदी करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेल्या या महापालिकेवर थेट सरकारचा अंकुश ठेवण्याचा राज्य सरकारचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - 'मुंबई २४ तास' योजनेला मंत्रिमंडळाची मंजूरी - आदित्य ठाकरे
राज्य सरकारने मंगळवारी २० प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली केली. यात शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांचाही समावेश आहे. राज्याच्या एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालक पदावरून नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी मुंढे यांची बदली करण्यात आली. यापूर्वी तुकाराम मुंढे यांनी नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून काम पाहिले होते.
२००९ साली मुंढे यांच्या कार्यशैलीमुळे नागपूर जिल्हा परिषदेत त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला होता. यानंतर त्यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता मुंढे नागपूर महापालिकेत येत आहेत.
'मुंढे यांच्या नियुक्तीने शहराच्या विकासाला गती मिळेल. अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांशी समन्वयाने काम केल्यास कुठलीही अडचण येणार नाही', अशी प्रतिक्रिया मुंढे यांच्या बदलीवर महापौर संदीप जोशी यांनी दिली. मुंढे यांची बदली नियमानुसार असून यामुळे शहराच्या विकासात कुठलाही अडथळा येणार नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते सांगतात.
तुकाराम मुंढे आणि पदाधिकारी, अधिकारी यांच्यातील वाद हा काही नवीन नाही. २०१७ ते २०१९ या कालावधीत त्यांच्या चार बदल्या झाल्या आहेत. राजकारण्यांच्या दबावाला न झुकता नियमानुसार काम करणे, ही तुकाराम मुंढे यांची पद्धत आहे. आता नागपूर महापालिकेत आयुक्त म्हणून बदली झाल्यावर मुंढे पदाधिकारी, नगरसेवक यांच्यासोबत कसे जुळवून घेतात आणि शहराचा विकास कसा साधतात, याकडे सर्वांच लक्ष आहे.