नागपूर: खर्रा, तंबाखू, सुपारी किंवा धुम्रपान सेवनाची सवय आधी ग्रामीण भागात अधिक होती; पण आताच्या सर्वेक्षणात आलेल्या माहितीनुसार शहरी भागातील लहान मुलांमध्येसुद्धा सिगारेट आणि खर्ऱ्याचे आकर्षण वाढू लागले आहे. त्यामुळे मुखरोगाशी संबंधित रोज दहा रुग्ण किशोरवयीन आहेत, अशी माहिती डॉ. आशिता कळसकर यांनी दिली आहे.
ओरल कॅबीटीचा धोका वाढला: प्रत्येकाने स्वतःचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणे जितके महत्त्वाचे आहे किंबहुना त्यापेक्षाही अधिक जास्त महत्त्वाचे आहे. त्याच बरोबर मौखिक आरोग्य जपणे हे देखील फार महत्त्वाचे आहे; मात्र दुर्दैवाने विदर्भात मौखिक आरोग्याला खर्रा, सुपारी, तंबाखू व धुम्रपानाची कीड लागली आहे. त्यातही आता महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये होणारा प्रसार चिंतेचा विषय आहे. दुर्दैवाने पालक या समस्येकडे फारसे गंभिर्याने बघत नसल्यामुळे लहान मुलांमध्ये ओरल कॅबीटीचा धोका वाढत आहे.
50 ते 70 लोकांना मुखरोग समस्या : नागपूरच्या शासकीय दंत रुग्णालयात येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी 50 ते 70 रुग्णांना मुखरोग संबंधित समस्या आहेत. खर्रा आणि सुपारीचे रोज सेवन केल्यामुळे सर्वाधिक समस्या ही जबडा जाम होण्याची आहे. याशिवाय तोंडाच्या कर्करोगांच्या समस्या देखील वेगाने वाढत आहेत.
हिरड्यांमध्ये कीड लागण्याचे प्रमाण: प्रामुख्याने 1 ते 10 वर्ष वयोगटातील लहान मुलांमध्ये हिरड्यांमध्ये कीड लागण्याची प्रमाण सर्वाधिक आहे. खेळताना जबड्याला मार लागणे सामान्य असले तरी त्याचा परिणाम दातांवर होतो; परिणामी पुढे त्यातून गंभीर आजार होऊ शकतो. लहान मुलांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्याची सवय जडत असल्याने विदर्भातील मुलांचे मौखिक आरोग्य धोक्यात सापडले आहे, अशी माहिती शासकीय दंत महाविद्यालयात आणि रुग्णालयाचे बाल दंत विभाग प्रमुख डॉ. रितेश कळसकर यांनी दिली आहे.
मुख रोगाच्या प्रमाणात दरवर्षी वाढ: शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात मोठ्या सोबतच लहान मुलांमध्ये खर्रा, गुटखा यासह तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण आहे. ग्रामीण भागातील एका गावातील 100 पैकी 60 पुरुषांना खर्रा, बिडी आणि तंबाखूचे व्यसन जडले आहे. तर ग्रामीण भागातील मुलांमध्ये मौखिक आजारचे प्रमाण 30 टक्क्यांपेक्षा अधिक आहे, तर आदिवासी भागात हे प्रमाण 60 टक्यांपेक्षा अधिक दिसून येत आहे.
वडिलधारी मंडळीचे अनुकरण : मुळात ही समस्या निर्माण करण्याचे काम त्या लहान मुलांच्या घरातूनच होते. वडीलधारी मंडळी दिवसभर खर्रा, बिडी, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सर्रासपणे सेवन करतात. यामुळे लहान मुले तंबाखूजन्य पदार्थांकडे आपसूकच आकर्षित होतात. नेमक्या याच कारणांमुळे लहान मुलांमध्येसुद्धा व्यसनाधीनता वाढत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे.
कॅन्सर रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक: तंबाखूचा विचार केला तर अनेक प्रकारची घातक रसायने त्यामध्ये असतात. त्यातील बरीचशी रसायने कॅन्सरकरिता पोषक ठरत असल्याचा निष्कर्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कर्करोग केंद्राच्या सर्वेक्षणातून पुढे आलेला आहे. तंबाखूमुळे होणाऱ्या कॅन्सरने पुरुषांचे मृत्यूचे प्रमाण 42 टक्के तर महिलांच्या मृत्यूचे प्रमाण 19 टक्के असल्याचा अहवाल देखील आला होता.
नागपुरातील कॅन्सरची टक्केवारी: कॅन्सर या जीवघेण्या आजाराच्या विळख्यात आता तर सर्वच वयोगटातील रुग्ण आढळून येतात. ३५ ते ६५ वयोगटातील रुग्णांचे प्रमाण यात सर्वाधिक आहे. नागपूर शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत तुम्हारे 12.9 लोकांना तोंडाचा कर्करोग झाला आहे तर हेच प्रमाण स्त्रियांमध्ये 5.3 आहे. अन्ननलिकेच्या यासंदर्भात पुरुषांमध्ये हे प्रमाण 6.4 टक्के आहे तर स्त्रियांमध्ये हे प्रमाण 3.9 टक्के आहे. शिवाय आतड्यांच्या कॅन्सरच्या श्रेणीमध्ये पुरुषांमध्ये हे प्रमाण 6.6 टक्के इतके आहे. तंबाखू गुटखा, खर्रा आणि धुम्रपानाचे प्रमाण हे पुरुषांमध्ये हे सर्वाधिक असल्या कारणाने स्वरयंत्र कर्करोगाचे रुग्ण नागपुरात आढळतात. त्यांचे प्रमाण 5.7 टक्के इतके आहे. महिलांच्या बाबतीत विचार केला तर तब्बल 28 टक्के महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण आढळून येतात. तर गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण हे सुमारे 13.2 टक्के इतके आहे.
व्यसनाधीन लोकांमध्ये असलेल्या कॅन्सरचे प्रमाण: नागपूरचा विचार केला असता तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांसह धुम्रपानामुळे होणाऱ्या कर्करोगाची संख्या लक्षणीय आहे. यामध्ये ओठाचा कॅन्सर झालेल्यांची टक्केवारी ही ०.६ इतकी आहे तर तोंडाचा कर्करोग होणाऱ्यांची संख्या १०.२ टक्के इतकी आहे. शिवाय तोंडाच्या मागचा भाग अर्थात जिभेच्या मागील भागात कॅन्सर होण्याचे प्रमाण देखील ०.९ टक्के इतके आहे. घश्याचा कर्करोग होण्याचे प्रमाण १.६ टक्के झाले आहे. या व्यतिरिक्त व्यसनाधीन लोकांमध्ये अन्ननलिकेत देखील कर्करोग आढळून येतो आणि हे प्रमाण ५.२ इतके असल्याची माहिती कर्करोग तज्ज्ञांनी दिली आहे.
हेही वाचा: Chatrapati Sambhajinagar News : 50 खोके घेऊन चोर आले; रॅप साँग म्हणणाऱ्या राज मुंगसेला अटक