नागपूर - इंटरनेटवरून देह विक्री व्यवसाय करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. इंटरनेटच्या माध्यमातून मुलींना पैशांचे आमिष दाखवून देह विक्री व्यवसाय करणाऱ्या टोळीवर नागपूर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कारवाई केली. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण आटोक्यात आल्याचे काही दिवसापूर्वींच पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले होते. त्यातच आता इंटरनेटचा वापर करून देहविक्री व्यवसाय होत असल्याचा प्रकार समोर आला. शहरातील विविध भागात ऑनलाइन पद्धतीने मुलींची फसवणूक करत त्यांना देह विक्री करण्यास प्रवृत्त केल्या जात होते. या प्रकरणाची नागपूर पोलिसांना माहिती मिळताच या टोळीवर कारवाई करण्यात आली आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाच्या गुन्हे शाखेला याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत बनावट ग्राहकांच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आरोपी विविध मोबाईल नंबरव्दारे मुलींचे फोटो ग्राहकांना पाठवत होते. पैशांची देवाणघेवाण देखील ऑनलाइन पद्धतीनेच होत होती. याचाच फायदा पोलिसांकडून कारवाई करताना घेतला गेला. शहरातील मनीष नगर भागात आरोपींना व मुलींना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये काही परराज्यातील मुलींचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत रफिक पठाण(रा. अहमदनगर), आफताफ शेख(रा. अहमदनगर), सौरभ सुखदेवे(रा. हिंगणे) या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा विभाग या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.