नागपूर: ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या नावावे धमकीचा मॅसेज आल्यानंतर पोलिसांनी मॅसेज करणाऱ्या व्यक्तीचा शोध लावला अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. प्राथमिक माहितीप्रमाणे त्या व्यक्तीने दारूच्या नशेत अशी धमकी दिली आहे. यासंदर्भात संपूर्ण तपास केला जाईल आणि ज्याने कोणी धमकी दिली असेल त्यावर कारवाई होईल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते नागपुरात बोलत होते.
सरकार शांत बसणार नाही: लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या नावावे धमकीचा मॅसेज मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी मुंबईतील कांजूर मार्ग पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. त्यानंतर मुंबई पोलीसांनी तपासाची चक्रे तात्काळ वेगाने फिरवत आरोपी आयडेंटिफाय केला आहे.फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात कोणी कोणालाही धमकी दिली तर सरकार आणि पोलीस शांत बसणार नाही. कोणताही व्यक्ती असली तरी कारवाई होईल असे देखील फडणवीस म्हणाले आहेत.
मी गृहमंत्री होतो,आहे आणि राहणार: गृहमंत्री झाल्यामुळे अनेकांची अडचणी झाल्या आहेत. याची कल्पना आहे. अनेक लोकांना असे मनातून वाटते की, मी गृहमंत्री राहिलो नाही तर बरे राहील. मात्र मी गृहमंत्री राहणार आहे. फडणवीस पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला गृह विभागाचा करभार दिला आहे. त्यामुळे जे चुकीचे काम करतील त्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्री म्हणून यापूर्वीही पाच वर्ष मी काम सांभाळले आहे. आताही जे लोक बेकादेशीरपणे काम करतील त्यांना मी सोडणार नाही असे फडणवीस म्हणाले आहेत.
मी कुणाला घाबरत नाही,दबतही नाही: जे जे लोक चुकीचे काम करतील बेकायदेशीर काम करतील त्यांच्यावर कारवाई होईल. मी पहिलेही सांगितले आणि आजही सांगतो मी कोणाला घाबरत नाही. कोणाला दबत नाही. जे कायदेशीर आहे, तेच करतो कायद्याने वागतो आणि या ठिकाणी कायद्यानेच राज्य चालेल. असेही ते म्हणाले.