नागपूर - कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. नागपुरातही कोरोना झपाट्याने वाढत आहे. मात्र, नागपुरात नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मास्क न घालणाऱ्यांकडून आता ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. शिवाय, पोलिसांकडून कडक कारवाई सुद्धा केली जाईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत आज विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर गृहमंत्री माध्यमांशी बोलत होते. या बैठकीला पालकमंत्री नितीन राऊतसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. बैठकीत रुग्णसंख्या नियंत्रण कशा पद्धतीने करता येईल, यावरही चर्चा करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच नागपुरात तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक येऊन गेले होते. पथकाने प्रशासकीय अधिकाऱ्यांना ज्या सूचना केल्या, त्याचेही पालन करा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.
शिवाय, सर्व अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन काम करत कोरोना रुग्णांचा आकडा कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्याचबरोबर, पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांसह आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना विशेष सुविधा, बेड उपलब्ध करण्याचे नियोजन सुरू आहे, असेही अनिल देशमुख यांनी सांगितले. बैठकीत पालकमंत्री नितीन राऊत यांनीही अधिकाऱ्यांना सूचना केल्या. शिवाय नागपुरात लॉकडाऊनची गरज नाही. बेड उपलब्ध न होण्याच्या तक्रारी आहेत. मात्र, त्याबाबतही नियोजन सुरू असल्याची माहिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली.
शहरात सध्यातरी ऑक्सिजनची कमतरता नाही. परंतु, भविष्यासाठी नियोजन केले जात आहे. त्यामुळे, जिल्ह्यात कोणतीही अडचण येणार नाही, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. तसेच, जिल्ह्यातील वाढता आकडा गंभीर आहे. त्यामुळे, नागरिकांनी नियमांचे पालन करून शासनाला मदत करावे, असे आवाहन यावेळी गृहमंत्री व पालकमंत्र्यांकडून करण्यात आले. या बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा- उमरेड शहरातील गांधीसागर तलावात आढळला नवजात बालकाचा मृतदेह