नागपूर - आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अतिवृष्टी आणि महापुरामुळे जे नुकसान झाले आहे यासह हेक्टरी किती मदत करता येईल यावर चर्चा झाली. तसेच, यावेळी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. मुंबई-पुणे येथे रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यावर चर्चा झाली. मुख्यमंत्री या संदर्भात तज्ज्ञांशी बोलून निर्णय घेतील, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
'केंद्र सरकारकडून दिली जाणारी मदत वाढण्यात आलेली नाही'
आज पार झालेल्या बैठकीत सांगली सातारा कोल्हापूर या भागात महापुराने 1 लाख 38 हजार हेक्टरचे शेतीचे नुकसान झाले आहे. यात (2019)या वर्षीच्या तुलनेत कमी असले, तरी हे नुकसान मोठे आहे. त्यावेळी 4 लाख 30 हेक्टर नुकसान झाले होते. यातच मागील तीन दिवसांत नुकसानीची परिस्थिती पाहता मागच्या तीन दिवसांच्या काळात अडीच लाख हेक्टर नुकसान झाले आहे. परंतु, केंद्र सरकारकडून यासाठी एनडीआरएफकडून हेक्टरी दिली जाणारी मदत वाढण्यात आलेली नाही. त्यामुळे 6800 रुपये हेक्टरी मदत देऊ शकतो. यामुळे दोन हेक्टर पर्यंत 13 ते 14 हजार पर्यंतची मदत दिली जाऊ शकते.
'मदतीसंदर्भात पुढील बैठकीत निर्णय घेतला जाईल'
मदत वाढवून देण्याची मागणी अनेक भागातील शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांनी केली. यावर आज चर्चा झाली आहे. पॅकेजची घोषणा मुख्यमंत्री यांनी अगोदरच केली आहे. पण हेक्टरी किती मदत द्यायची यावर निर्णय झाला नव्हता. सर्वच भागातील शेतकऱ्यांना एक समान वाटप केले पाहिजे. कोणाला कमी कोणाला जास्त होऊ नये, यावरही चर्चा करण्यात आली आहे. पण ऊस लागवड भागत शेतकरी पीकविमा उतरवत नाही. त्यामुळे तेथे अधिकची मदत करावी अशी मागणी लोकप्रतीनिधींनी केली आहे. यामुळे मदतीचा फार्मूला काय असेल हे ठरवण्यासाठी आणखी बैठक घेतली जाणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय होईल असही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
'राजू शेट्टी यांच्याशी मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शेतीकरी नेते राजू शेट्टी यांच्याशी चर्चा झाली आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार जिरायती जमिनीसाठी 13 हजार 600 तर, बागायती जमिनीसाठी 18 हजार रुपयांची मदत दिली जाऊ शकेल. वाढीव मदत देण्यासंदर्भात मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, अशी माहितीही मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. अतिरिक्त मदतीसंदर्भात केंद्रसरकारला मागणी करायची आणि आणि केंद्राकडून मदत जाहीर झाल्यास ती वाढवून शेतकऱ्यांना द्यायची अशी भूमीका यावेळी मांडण्यात आल्याचही ते म्हणाले.
'कोरोना निर्बंधांबाबत नवीन नियमावली दोन दिवसात जाहीर होणार'
आता लवकरच गणपती आणि नवरात्र सण येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोना निर्बंधांबाबत काही नवीन निर्णय घेतले जाणार आहेत. परंतु, नाईट कर्फ्यु संदर्भात आज झालेल्या बैठकीत कुठलीही चर्चा झाली नाही. तो विषयच चर्चेत आला नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले आहेत. पण, कोरोनाबाबतची परिस्थिती पाहता मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहे. यामुळे या संदर्भाने येत्या दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तज्ज्ञ मंडळींशी चर्चा करुन निर्णय घेतील. तसेच, कोरोनाबाबतच्या निर्बंधांसंदर्भात येत्या दोन दिवसांत नवीन नियमावली जाहीर होईल, अशी माहितीही वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना दिली आहे.