नागपूर Theft In Nagpur : मृतदेह आणि नातेवाईकांना घेऊन राज्याबाहेर निघालेल्या रुग्णवाहिकेच्या चालकानं ( Ambulance Driver ) स्वतःच्या मुलाला मृत्यू झालेल्या नागरिकाच्या घरी चोरी ( Theft In Nagpur ) करण्याची टिप दिल्यानं खळबळ उडाली आहे. चालकाच्या मुलानं वडिलांनी दिलेल्या टिपच्या आधारे बंद घरात चोरी केली. मात्र, पोलिसांच्या तपासात त्यांचं बिंग फुटल्यानं सक्करदरा पोलिसांनी ( Nagpur police ) बापलेकाला अटक केली आहे. एकंदरीत हा प्रकार मृतकांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा दिसतोय. अश्वजीत वानखडे आणि नितेश वानखेडे असं अटक केलेल्या बापलेकाचं नाव आहे. याशिवाय प्रत्यक्षात चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
कल्पना घोडे यांच्या पतीचं निधन : सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सोमवारी क्वॉर्टरमध्ये राहणाऱ्या कल्पना घोडे यांच्या पतीचं उपचारादरम्यान 20 ऑगस्टला निधन झालं होतं. घोडे कुटुंब मध्यप्रदेशातील बैतुल येथील रहिवासी असल्यानं त्यांनी मृतदेह बैतुल इथं नेण्याचं ठरवलं. त्यानुसार रुग्णवाहिकेतून मृतदेह घेऊन ते बैतुलसाठी रवाना झाले. घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यानं कल्पना घोडे या शोकमग्न असल्यानं त्यांनी आवश्यक वस्तू, कपडे आणि पैसे घेऊन बैतुलच्या प्रवासाला सुरुवात केली.
मृतदेह बैतुलला जाताच घरी चोरी : घरातील सर्वच सदस्य बैतुलला गेल्यानं घर कुलूपबंद करण्यात आलं होतं. ज्या रुग्णवाहिकेच्या चालकाला मृतदेह नेण्यासाठी बोलावलं होतं त्यानं याबाबत स्वतःच्या मुलाला माहिती देऊन मृत्यू झालेल्या त्या बंद घरात चोरी करण्याची टिप दिली. त्या मुलानंदेखील त्याच रात्री कल्पना घोडे यांच्या घरात प्रवेश करत मोबाईल रोख रक्कमेसह लाखोंचे दागिने लंपास केले.
अंत्यसंस्कार सुरू असताना घरात चोरी : पतीच्या निधनानंतरचे सर्व विधी पूर्ण करून कल्पना घोडे या घरी परतल्या. मात्र घरी परतल्यानंतरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. एकीकडं घरचा कर्ता पुरुष निघून गेल्याचं दुःख असताना घरात चोरी झाल्याचं समाजल्यानंतर त्या खचून गेल्या.
सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा भांडाफोड : पतीच्या निधनाचं दुःख बाजूला सारून कल्पना घोडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावेळी पोलिसांनी तपासाला सुरुवात करुन घराच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीतील फुटेज तपासलं. त्यात ३ तरुण मोपेडवर येऊन चोरी करून गेल्याचं समोर आलं. सक्करदरा पोलिसांनी तात्काळ त्या मुलांच्या वर्णनावरून इमामवाडा हद्दीतून नितेश वानखडेला अटक केली. त्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
हेही वाचा :
ATM Theft In Nagpur : शेकडो सीसीटीव्ही तपासल्यानंतर एटीएम फोडणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Nagpur Crime : कोहाड कुटुंब रिसेप्शनसाठी बाहेर पडताच चोरट्यांनी मारला दागिन्यांवर डल्ला