नागपूर: प्रताप नगर परिसरातील फ्रेंड्स कॉलनीत राहणारे एक सधन कुटुंब सहपरिवार खासगी कामा निमित्ताने हैदराबादला गेले होते. या संधीचा फायदा घेत अमोल राऊत नावाच्या कुख्यात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. आणि ४५० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला. अमोल राऊत हा घरफोडीच्या गुन्हात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी सापळा रचला होता. पोलिस त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. त्याच्या हालचाली संशयास्पद दिसून येताच पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या विरुध्द चोरी आणि घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
२१ गुन्ह्यातील २६ लाखांचा मुद्देमाल जप्त : गेल्या काही दिवसांपासून हुडकेश्वर, अजनी बेलतरोडी, सक्करदरा,नंदनवन आणि वाठोडा भागात घरफोडी, चोरी आणि चेन स्नॅचिंग सारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. विशेषतः जून महिन्यातच चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे पोलिसांनी चोरट्यांनी अटक करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली होती, त्याअंतर्गत पोलिसांनी चोरी, घरफोडी यांच्यासह २१ गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. एवढंच नाही तर पोलिसांनी आरोपींच्या कडून सुमारे २७ लाखांचा माल जप्त केला आहे.
![26 lakh seized](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ngp-01-27-lakhs-seized-21-crime-30-accused-arrested-7204462_23062022085449_2306f_1655954689_950.jpg)
या 21 गुन्ह्यात चार टोळ्यांचा समावेश : त्यापैकी एक महिला चोरांच्या टोळीचा समावेश आहे. शहरातील गजबजलेल्या परिसरात चोरी आणि घरफोडीच्या घटनांसह मॉर्निंग वॉकसाठी जात असलेल्या महिलांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरीच्या घटना वाढल्या होत्या. हे पाहता पोलिसांनी महिला गुन्हेगारांच्या टोळीवर लक्ष केंद्रित केले होते. अनेक पोलीस ठाण्याच्या पथकांनी २१ गुन्ह्यात सहभागी असलेल्या ३० पेक्षा अधिक आरोपींना अटक केली आहे.काही अल्पवयीन आरोपींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये चार टोळ्यांचा समावेश असून त्यापैकी एक महिला चोरांच्या टोळीचा समावेश आहे.