नागपूर - महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेला परवानगी नाकारल्याने महापौर संदीप जोशी संतप्त झाले आहेत. १२ जूनला अतिरिक्त आयुक्तांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सोबत चर्चाकरून सभेला परवानगी देत असल्याचे पत्र दिले होते. मात्र, आता आयुक्तांनी सभा घेणे संयुक्तिक नसल्याचे सांगत परवानगी नाकारली आहे. आयुक्तांनी घेतलेली भूमिका चूकीची आहे, असे महापौर संदीप जोशी यांनी म्हटले आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी परवानगी नाकारली असली तरी सर्वसाधारण सभा घेण्यावर महापौर संदीप जोशी ठाम आहेत. सर्वसाधारण सभा घेण्याच्या संदर्भांत रीतसर परवानगी दिल्यानंतर ती पुन्हा रद्द करण्याचा आयुक्तांच्या निर्णयाविरोधात संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच सत्ताधारी आणि विरोधक तुकाराम मुंढे यांच्या विरोधात एकवटले होते. मुंढे यांच्या विरुद्ध महानगरपालिका सभागृहात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा इशाराही सत्ताधारी आणि विरोधकांनी दिला होता.
आता पावसाळा सुरू झाला आहे. शहरात अनेक गटर लाईन बुजलेल्या आहेत. जास्त पाऊस झाल्यास नागरिकांच्या घरात पाणी जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. फुटपाथवरील गडर उघडे पडले आहेत. जागो-जागी रस्त्यांची कामे अर्ध्यावरचं ठप्प पडली आहेत. अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या असल्याने नागरिक नगरसेवकांना जाब विचारू लागले आहेत. वरील सर्व प्रश्नांची उत्तरे प्रशासनाकडून मिळतील म्हणून सर्वसाधारण सभेचे आयोजन केले जाणार होते. मात्र, आयुक्तांनी सभेला परवानगी नाकारून नव्या वादाला फोडणी दिली आहे, असे महापौर जोशी म्हणाले.
राज्य शासनाच्या निर्देशानुसारच सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. तीन जूनला राज्य सरकारने काढलेल्या पत्राचा दाखला देखील त्यांनी दिला. सभागृहच नव्हे तर विविध विषय समित्यांच्या बैठका घेण्याचा निर्णय हा महानगरपालिका स्तरावर घेतला जावा, असे त्या पत्रात नमूद आहे. त्यामुळे महापौर संदीप जोशी यांनी सभा घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्या सभेला आयुक्त न आल्यास पुढील निर्णय सर्व पक्षांच्या नगरसेवकांशी चर्चा करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.