नागपूर - कोरोनाच्या या संकटकाळात कैलास मानसरोवर यात्रेकरूंसाठी एक आनंदाची बातमी आहे. पिथोरागड ते मानसरोवर मार्गाचे बांधकाम प्रगतीपथावर असून येत्या सहा महिन्यात हा मार्ग बनून तयार होणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
कैलास मानसरोवर दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना मोठ्या कठीण व अडचणींच्या मार्गाने प्रवास करावा लागतो. मात्र हा मार्ग उत्तराखंडच्या लिपूलेखहून थेट चीनच्या सीमेपर्यंत जाणार आहे. ज्यामुळे ९० किलोमीटरचा कठीण मार्ग मोकळा होऊन थेट वाहनाने चिनी सीमेपर्यंत जाता येणार आहे. या रस्त्यामुळे अनेक गावे जोडता आली आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने या प्रकल्पाच्या बांधकामाची जबाबदारी हाती घेतली आहे. १७ हजार फूट उंचीवर उणे ६ डिग्री सेल्सियसमध्ये जवानांनी या प्रकल्पावर कार्य केले. या प्रकल्पाचे साहित्य हेलिकॉप्टर ने त्या ठिकाणी पोहचविण्यात आले. हा प्रकल्प पूर्णत्वास नेणाऱ्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या जवानांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अभिनंदन केले.