नागपूर - दुष्काळामुळे शेतकरी जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. या संकटातच खरीप हंगामाची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यात आता खतांच्या दरवाढीचे नवे संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहीले आहे. रासायनिक खतांच्या किंमती वाढल्याने शेतकऱयांच्या संकटात भर पडली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजेच खताच्या एका बॅगमागे २८० रुपयांपर्यंत ची दरवाढ झाली आहे. याचा मोठा फटका दुष्काळाचा मार सहन करत असलेल्या शेतकऱ्यांना बसणार आहे.
रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांचे खरीपाचे बजेट पुर्णता बिघडले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किंमती वाढल्याने खतांची दरवाढ झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे दुष्काळाचा मार सहन करणाऱ्या शेतकऱ्यांवर हे नवे संकट ओढवले आहे. दरवाढीमुळे यंदाच्या खरीपात शेतीचा लागवड खर्चं आणि उत्पादन खर्च वाढणार आहे. इतका खर्च करुनही जर शेतमालाचे दर वाढले नाही, तर शेतकरी मरणाच्या दारात उभा ठाकल्याशिवाय राहणार नाही.