नागपूर - महाविकास आघाडी सरकारने आज एक वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. त्यानिमित्ताने विरोधीपक्ष असलेल्या भाजपाकडून राज्यातील प्रमुख नेत्यांनी सरकार विरोधात पत्रकार परिषद बोलावली होती. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर जोरदार आगपाखड केली. या सरकारने विदर्भावर अन्याय करण्याचे धोरण अवलंबले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. राज्य सरकारची कुवत असताना सुद्धा उपलब्ध असलेले बिनव्याजी कर्ज सुद्धा घेण्याची हिम्मत या सरकारमध्ये राहिली नसल्याचे ते म्हणाले.
फडणवीसांचे सरकार गेले, फसविणाऱ्यांचे आले -
राज्याच्या जनतेचा एका वर्षातच अपेक्षांचा भंग झाला आहे. आज जनता अडचणीत आहे. या सरकार ने जनतेचे प्रश्न कोमात टाकले आहे. एक वर्षांपूर्वी फडणवीस यांचे सरकार गेले आणि फसविणाऱ्यांचे सरकार आले असल्याचे ते म्हणाले. या सरकारने सुरुवात स्थगिती ने केली. आता मात्र स्थगिती सरकार सूड घेणारे सरकार झाले असल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी करत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्य सरकार म्हणून वर्षभरात या सरकारचे घेतलेले अनेक निर्णय तर्कशुन्य असल्याचा आरोप त्यांनी केला.
हे उलट्या डोक्याचे सरकार -
सरकारने पहिल्या दिवशीपासून मंत्रिमंडळात 43 मंत्री घेतले. त्यात 33 कॅबिनेट मंत्री असून त्यांच्या मंत्रिमंडळाच्या नावांची सुरुवात 'यु' ने होते आणि अखेर 'ए' वर होतो. हे उलट्या बाराखडीचे नव्हे, तर उलट्या डोक्याचे सरकार आहे. प्रत्येक मंत्री आपला यश झाकण्यासाठी केंद्र सरकारचा नाव घेतो आहे. केंद्राने निधी दिले नाही, असे म्हणतो आहे. मग राज्याच्या मंत्र्यांनी फक्त पाट्या लावणे आणि दालने सजवणे एवढेच मंत्र्यांची काम आहे का, आज महाराष्ट्रामध्ये लढणारे नव्हे, तर रडणारे सरकार आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्य सरकारचा विदर्भाशी दुजाभाव -
१९६० पासून पाळला जाणारा नागपूर कराराचा यांनी भंग केला आहे. नागपूरात हिवाळी अधिवेशन न घेता मुंबईत पळविले असल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला. तसेच एका वर्षात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी विदर्भात पायही ठेवला नाही. एक झूम मिटिंग सुद्धा घेतली नाही. विदर्भात तापमान जास्त असते. मात्र, तुमचे पाय जळणार नसल्याचा टोला मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना लागवला. वैधानिक विकास महामंडळ जे विदर्भ, मराठवाड्याचे कवच कुंडल आहेत, ते या सरकार ने काढून घेतले असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शिवसेनेचे स्वतःचा जाहिनाम्याकडे दुर्लक्ष -
शिवसनेने बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो छापून त्यांच्या वचननाम्यात 300 युनिटपर्यंत माफी देण्याचे वचन दिले होते. बाळासाहेब हे शब्दाला जगणारे नेते होते. मात्र, शिवसेना त्या वचनाम्याकडे दुर्लक्ष करत आहे. सरकारने वीज ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी आर्थिक स्थिती चा मुद्दा समोर केला. मात्र, तेच सरकार बिल्डर्स ना स्टॅम्प ड्युटी वर सूट देते. मंत्र्यांच्या दालनावर खर्च करते. तेव्हा कोरोना नसतो का, असा प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.