नागपूर - आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचा जगण्यासाठी सुरू असलेला संघर्ष मांडणाऱ्या 'तेरावं' नाटकाचा प्रयोग नागपुरात रंगला. या नाटकाचा प्रयोग पाहून उपस्थित प्रेक्षक स्तब्ध झाले. साहित्य संम्मेलनाप्रमाणेच नाट्य संमेलनातील नाटकाचा हा प्रयोग प्रेक्षकांची विशेष दाद मिळवून गेला.
श्याम पेठकर लिखित आणि हरिष इथापे दिग्दर्शित या नाटकातून शेतकरी विधवांचे दुःख न मांडता त्याच्या जगण्यातील सकारात्मक संघर्ष मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील ५ विधवा, ४ मुली आणि ऍग्रो थिएटरचे कलाकारांनी मिळून हा नाट्यविष्कार सादर केला.
शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना जगताना कौटुंबीक आणि सामाजिक दृष्ट्या येणाऱ्या अडचणी आणि त्यावर तेरावं संघटनेद्वारे शोधलेले उपाय या नाटकातून मांडण्यात आले. याशिवाय पती नसताना भेडसावणाऱ्या अडचणी या नाटकातून मांडण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील अंधश्रद्धा, मद्यपान, अविश्वास, कौटुंबिक कलह यातून निर्माण होणारे प्रश्नांनाही या नाटकातून वाचा फोडण्यात आली आहे.
शेतकऱ्याच्या विधवा पत्नीला शेती करण्याची परवानगी कुटुंबीयांनी द्यावी. शक्य असल्यास शेती सुनेच्या नावे करावी, असा संदेश या नाटकाद्वारे देण्यात आला आहे. नाट्य संमेलनात प्रयोग केल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढल्याचे या महिला आणि मुलींनी सांगितले. नाटकाच्या माध्यमातून आपले म्हणणे जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तेरवचा हा प्रयोग म्हणजे ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाटय संमेलनाचा सर्वात उत्कर्षबिंदू ठरला.