नागपूर : Shri Ram Pranpratistha ceremony : अयोध्येत प्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळा (22 जानेवारी) रोजी होतोय. भारतात सध्या 'श्रीराम' नामाचा जप सुरू आहे. जिकडे-तिकडे श्रीरामाची भक्ती आणि जयघोष सुरू आहे. यातून प्रेरित होऊन नागपूर येथील मेहंदी कलाकार महिलेने आगळावेगळा संकल्प केलाय. सुनिता धोटे नामक मेहंदी कलाकार या स्त्रियांच्या हातावर रामायणातील प्रसंगांची पोट्रेट मेहंदी काढत आहेत. त्या ही मेहंदी निशुल्क काढत आहेत. त्यामुळे स्त्रियांची मोठी गर्दी होत आहे. सुनीता धोटे यांना मेहंदीच्या माध्यमातून एक पोट्रेट काढण्यासाठी साधारणत: अर्धा ते पाऊण तास लागतोय. त्या दिवसाला 15 ते 20 महिलांच्या हातावर मेहंदी काढत आहेत. 101 महिलांच्या हातावर पोट्रेट काढण्याचा संकल्प त्यांनी केला असून, आत्तापर्यंत 75 महिलांच्या हातावर राम, सीता, लक्ष्मण साकारले आहेत. सुनीता धोटे प्रोफेशनल मेहंदी कलावंत आहेत. त्यांनी 15 जानेवारीला हा उपक्रम सुरू केला. त्यांना राम अयोध्येत विराजमान होईपर्यंत किमान 101 महिलांच्या हातावर सीता-राम व लक्ष्मण, हनुमान भेट यासह अशोक वाटिकेतील प्रसंग मेहंदीच्या माध्यमातून रेखांकित करायचे आहेत. दररोज किमान 11 महिलांच्या हातावर श्रीराम सीतेचं चित्र रेखांकित करत आहे.
दिवसातील १८ तास काढतात मेहंदी : शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत श्रीरामाचं आगमन होत आहे. समाजातील प्रत्येक घटक प्रभू रामाच्या भक्तीत तल्लीन झाला असल्याने, मी माझ्या या कलेच्या माध्यमातून श्रीराम भक्ती सुरू केली असल्याचं सुनीता धोटे यांनी सांगितलं आहे. त्या दिवसातील 18 तास मेहंदी काढून आपला संकल्प पूर्ण करणार आहेत. त्यांना राम- सीता यांच्या संयुक्तिक चित्राची मेहंदी काढण्यासाठी किमान अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागतो आहे. केवळ रामाची प्रतिकृती काढण्यास 20 मिनिटं लागतात. दररोज सकाळी 10 वाजता त्या मेहंदी काढण्यास सुरुवात करतात. तर, रात्री उशिरापर्यंत हातावर मेहंदी काढून घेण्यासाठी त्यांच्याकडे महिलांची गर्दी जमलेली असते.
कायम धार्मिक कार्यात अग्रेसर : कुठल्याही समाजाचे धार्मिक कार्य असो की सामाजिक कार्य त्यामध्ये सुनीता धोटे कायम अग्रेसर असतात. मेहंदी आणि रांगोळीच्या माध्यमातून त्या आपल्या कलेचं सादरीकरण करतात. निरंतर 75 तास मेहंदी काढण्याचा रेकॉड सुनीता यांच्या नावाने नोंदवण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी 890 लोकांच्या हातावर मेहंदी काढली होती. खासदार महोत्सवात 32 हजार महिलांच्या हातावर मेहंदी काढण्यात आली तेव्हा त्या उपक्रमाचं नेतृत्व सुनीता यांनी केलं होतं.
हेही वाचा :
2 रामलल्ला गर्भगृहात होणार विराजमान : राम जन्मभूमीत तिसऱ्या दिवशी धार्मिक विधींचा उत्साह