नागपूर: वेदांताच्या संदर्भात आदित्य ठाकरे खोटं बोलत आहेत. माहितीच्या अधिकारातुन काही माहिती समोर आली आहे, त्यातून स्पष्ट झालं आहे की महाविकास आघाडी सरकारने कुठेही वेदांताला जागा दिलेली नव्हती. त्यासंदर्भात कुठेही बैठक घेतली नाही. त्यामुळे वेदांता परत गेला आहे. वेदांता प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे गेला आहे.
शासकीय जीआर: उद्धव ठाकरे 18 महिने मंत्रालयातच येत नव्हते. मग कंपन्याचे प्रतिनिधी कोणाशी बोलले असते. त्या काळात कुठलेही शासकीय जीआर काढले नाही. जमीन दिली नाही. आता खोटारडेपणाचा कळस करत आहेत, असा आरोप वनमंत्री सुधीर मुनगंटीवार Forest Minister Sudhir Mungantiwar यांनी केला आहे. ते आज नागपूर विमानतळावर पत्रकारांसोबत बोलत होते.
या काळात पीक विमा कंपन्यांची चांदी: महाविकास आघाडी सरकारने विमा कंपन्यांना पैसे दिले, खरे मात्र अडीच वर्षे कधीही आढावा घेतला नाही. कोणत्याही जिल्हा पालकमंत्र्यांनी, कृषीमंत्र्यांनी आढावा घेतला नाही. खरिपाच्या आढावा बैठक सुद्धा त्या काळात झाल्या नाही. पीक विमा कंपन्या सरकारकडून पैसे घेत होते. मात्र खरोखर शेतकऱ्यांना त्यांनी परतावा दिला की नाही हे पाहण्याकडे कोणाचाही लक्ष नव्हतं.
विमा कंपन्यांच्या प्रकरणात भ्रष्टाचार: महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमा कंपन्यांवर कोणाचाही नियंत्रण नव्हते, म्हणून विमा कंपन्यांनी त्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर पैसे खाल्ले. हे मागच्या मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमा कंपन्यांच्या प्रकरणात जो भ्रष्टाचार झाला आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. उच्चस्तरीय चौकशी करा, अशी सुधीर मुनगंटीवार यांनी मागणी केली आहे.
राज्यपालांचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही: उदयनराजे असो किंवा आम्ही आमची सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही. मात्र, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांना ठेवायचे की नाही हे आमच्या अधिकार क्षेत्रात नाही. त्यादिवशी राज्यपालांची चूक झाली आहे. त्यांना ठेवायचे की नाही ठेवायचे हा आमचा अधिकार क्षेत्र नाही.
संजय राऊतांची टिव टिव: राज्यसभा खासदार संजय राऊत हे नुसते टिव टिव करतात. त्यांना वाटेल ते सामनातून छापून आणतात, आणि मग सकाळी मीडियासमोर येतात. आम्ही त्याच त्या बाबींना किती दिवस उत्तर द्यायचं.