नागपूर - भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि नागपूर शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी शहरात सुरू असलेल्या विकास कामांच्या दर्जावरून सरकारवर टीका केली आहे. शहरात चहू बाजूस सिमेंटच्या रस्त्यांचे काम सुरू आहे, पण कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
नागपूर शहरात सध्या सर्वत्र सिमेंट रस्त्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे शहराचा चेहरा-मोहरा बदलतोय, डांबर रोडच्या तुलनेत सिमेंट रस्त्यांचे आयुष्य चांगले असल्याने महापालिका सध्या सिमेंटच्या रस्त्यावर भर देत आहे. मात्र, सध्या सिमेंट रस्त्याचे सुरु असलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे भविष्यात अनेक समस्या उद्भवणार असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाच्याच आमदार सुधाकर कोहळे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून या सिमेंटच्या रस्त्यांकडे पाहिले जात आहे, असे असतानासुद्धा निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने याचे फायदे कमी आणि नुकसान जास्त होणार असल्याचे आता स्पष्ट होते आहे. नरेंद्र नगर ते म्हाळगीनगरपर्यंत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामध्ये गुणवत्ता नसून अनेक ठिकाणी खड्डे असल्याने त्यात पावसाळ्यात पाणी साचून अपघात होण्याची शक्यता असल्याचे कोहळे यांनी सांगितले आहे. सोबतच भविष्यात होणाऱ्या दुर्घटनेसाठी बांधकाम विभाग जबाबदार असल्याचे सांगत कोहळे यांनी राज्यसरकारला घराचा आहेर दिला आहे.