नागपूर - कोरोनाच्या या महासंकटाची तीव्रता कमी झालेली असल्यामुळे आता जवळपास 10 महिन्यांनंतर शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनामुळे सर्वच ठप्प झाले असताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न म्हणून शाळादेखील बंद करण्यात आल्या होत्या. अनलॉकच्या प्रक्रियेत सर्वात शेवटी शाळा सुरू करण्यासंदर्भांत निर्णय घेतला जात आहे. १४ डिसेंबरपासून नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेची पहिला घंटा ज्या दिवशी वाजली त्या दिवशी तर एक-दोनच विद्यार्थी शाळेत आले होते. मात्र, आज चार दिवसानंतर शाळेतील परिस्थितीचा ईटीव्ही भारतने आढावा घेतला. यावेळी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
विद्यार्थी संख्या वाढण्याची शक्यता...
नागपूरच्या ग्रामीण भागातील शाळेतील वर्ग नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. पहिल्या दिवशी अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी होती. मात्र. यानंतर आता विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली असून ती 50 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. या आठवड्यात ती 75 टक्के होण्याचा अंदाज आहे.
पालकांचाही उत्तम प्रतिसाद
सध्या अनेक शाळेत रोज चार तासिका घेतल्या जात आहे. यात इंग्रजी, गणित, विज्ञान तसेच हिंदी आणि मराठी या विषयांचा समावेश आहे. शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाने शाळा व्यस्थापनाला केलेल्या सूचनांचे सर्व शाळांकडून काटेकोर पालन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थी आणि पालक यांचाही उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - '..तर आणलेले आमदार त्यांना टिकवता आले असते'
ऑनलाइन अभ्यासाची कटकट सुटली एकदाची -
लॉकडाऊनमुळे शाळा बंद करण्यात आल्यानंतर बहुतांश शाळांनी ऑनलाइन शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली होती. आता विद्यार्थी या ऑनलाइन शिक्षण पद्धतीला पुरते कंटाळले आहेत. ग्रामीण भागात मात्र ही व्यवस्था फारसी प्रभावी ठरत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा आणि मित्रांचा सहवास त्यांना खुणावत आहे. त्यामुळे आता विद्यार्थी पुन्हा आपल्या शाळेकडे वळताना आपल्याला बघायला मिळत आहे.