नागपूर Student Rape Case Update : तपास लागत नसल्यानं पोलिसांनी आता आरोपीचं स्केच जारी केलं असून आरोपी संदर्भात माहिती देणाऱ्याला पाच लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. एवढंच नाही तर महाविद्यालयाच्या जवळ ज्या ठिकाणी बलात्काराची घटना घडली होती तो परिसर झाडी झुडुपांनी वेढलेला आहे. पुढे जंगलाचा भाग असल्यामुळे आरोपी नेमका कोणत्या मार्गाने पळून गेला आहे, याचा अंदाज यावा म्हणून पोलिसांनी दिवसा आणि रात्री ड्रोनचा वापर करून संपूर्ण परिसराचं मॅपिंग करणं सुरू केलं आहे.
एकूणच घटनाक्रम असा आहे : वर्धा येथे राहणारी तरुणी ४ ऑक्टोबर रोजी गावावरून जामठा परिसरात उतरली. जामठा परिसरातील महाविद्यालयात शिकत असल्याने ती बॅग घेऊन महाविद्यालय परिसरात असलेल्या होस्टेलमध्ये जात होती. रस्ता हा जंगली भाग असल्याने एका अज्ञात इसमाने तिचा पाठलाग सुरू केला. बराच वेळ तो तिच्या मागावर होता. आरोपीने त्याच्या जवळ असलेल्या कुऱ्हाडीचा धाक दाखवत तरुणीला बळजबरीने जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने तरुणीला कुऱ्हाडीने जखमी केलं नसले तरी झटापटीत तरुणीच्या शरीरावर जखमा झाल्या आहेत.
बहिणीला दिली माहिती, पण अनर्थ घडला : आरोपी पाठलाग करत असल्याने धास्तवलेल्या तरुणीने आपल्या मोठ्या बहिणीला फोनवरून याबाबतची माहिती दिली. पीडित तरुणीच्या बहिणीने महाविद्यालय प्रशासनाला ही बाब कळविली. मात्र, तोपर्यंत अज्ञात इसमाने पीडित तरुणीवर अतिप्रसंग केला. बहिणीने फोन केल्यानंतर लगेचचं महाविद्यालयतील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. काही वेळाने हिंगणा पोलिसांचे पथकही घटनास्थळी आले होते. या प्रकरणाची तक्रार हिंगणा पोलिसात करण्यात आली.
पोलिसांनी केली दिरंगाई : महाविद्यालयाकडे जाणाऱ्या निर्जन रस्त्यावर दुर्दैवी घटना घडली आहे. घटना ४ ऑक्टोबरला घडली. मात्र, पोलिसांनी सुरुवातीला गांभीर्याने घेतले नाही असा आरोप केला जातो आहे. ही घटना घडल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने तत्परता दाखविल्यानंतर पोलिसांनी सूत्रे हलविली.
पोलिसांनी केली टाळाटाळ : हिंगणा पोलिसांनी प्रथम दर्शनी ही छेडखानीची घटना असल्याने विशेष लक्ष दिले नाही. मात्र, वैद्यकीय तपासणी केल्यानंतर, ज्याचा अहवाल बघून पोलिसांचीही तारांबळ उडाली. नागपूरच्या सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, पोलीस उपायुक्त अनुराग जैन, ठाणेदार विशाल काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग जाधव यांच्यासह महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. प्रकरणाची चौकशी पोलिसांनी करून अज्ञात आरोपी विरुद्ध भादंवि ३७६, ३४१, ५०६(२), ५०४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी हा मजूर किंवा लाकूडतोड्या असू शकतो : पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपी हा मजूर किंवा लाकूडतोड्या असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याच्या शोधासाठी स्थानीय गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तयार करण्यात आले आहे. आता स्केच जारी करण्यात आल्यानं तपासाला गती मिळेल अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा:
- Bareilly Crime News : कुठुन येते इतकी क्रुरता? विनयभंगाला विरोध केल्यानं ट्रेनसमोर फेकले; विद्यार्थीनीची प्रकृती चिंताजनक
- Thane Crime: चार्जरच्या वायरने झोपलेल्या मित्राचा गळा आवळून खून, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
- Herambh Kulkarni : हेरंब कुलकर्णी यांना मारहाण करणाऱ्या तिघांना फिल्मी स्टाइलनं अटक, दोघे फरार