नागपूर - विदर्भातील कापूस खरेदीत हमीभावापेक्षा कमी दर दिल्या जात आहे. शेतकऱ्यांची होत असलेली ही लूट थांबवा, अशी मागणी काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी केली आहे. प्रति क्विंटल मागे जवळजवळ १००० रूपये इतका कमी दर शेतकऱ्यांना दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव देण्यात यावा, अशा मागणीचे पत्र पारवे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
जिल्ह्यातील बहुतांश भागात कापसाला हमीभाव दिला जात नाही. बाजार समिती, जिनिंगमध्ये प्रतिक्विंटल मागे १००० ते १२०० रूपये इतकी लूट सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची होत असलेली ही लूट थांबवण्यासाठी दोषींवर कडक कारवाई करा, अशी मागणी काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. एकीकडे आधीच पूरामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यात पुन्हा कापसाच्या हमीभावात होणारा हा काळाबाजार शेतकऱ्यांचे कबंरडे मोडणारा आहे. त्यामुळे ही बाब गंभीर असल्याचेही पारवे यांनी सांगितले. एमएसपीच्या दरानुसार ५८२५ रूपये कापसाचा दर असताना प्रत्यक्ष खरेदी मात्र ४५०० रूपयांने केल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल मागे १००० रूपये इतका फटका बसतो आहे. शिवाय शासनाने कापूस खरेदीही तात्काळ सुरू करावी, यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळवल्याचे पारवे यांनी सांगितले. शिवाय हमीभाव न मिळत असल्याने शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे. परंतु, शासनाची खरेदी सुरू होईपर्यंत आर्थिक गाडा कसा चालवायचा, असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे नाईलाजाने कमी दरात कापूस विक्री करावी लागत असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.
एकंदरीत विदर्भातील शेतकऱ्यांची सद्यस्थिती पाहता कापसाच्या आवकाला सुरूवात झाली आहे; परंतु शासकीय खरेदी सुरू होईपर्यंत तरी एमएसपीच्या नियमानुसार दर मिळावे, ही अपेक्षाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शिवाय या सर्व स्थितीवर शासन लवकरच तोडगा काढावा. तसेच लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी पारवे यांनी केली आहे.