नागपूर - कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा दिवस रात्र प्रयत्न करत आहे. मात्र, दिवसेंदिवस रूग्ण संख्येत होणारी वाढ ही चिंताजनक ठरत आहे. नागपुरातही कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रणाबाहेर जात आहेत. विशेषतः मृत्यूदरात होणारी वाढ थक्क करणारी आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर शहर व ग्रामीण भागातील मृत्यू दराला आळा घालण्यासाठी नियोजन करा,अशी ताकीद आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
आरोग्य अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी आरोग्य यंत्रणेला या सूचना दिल्या. शिवाय मृत्यूदर लवकरात लवकर रोखने अत्यंत गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
राज्यात कोरोनाची स्थिती ही दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. रूग्णसंख्येत होणारी वाढ आरोग्य यंत्रणेच्या नियंत्रणा बाहेर जात असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात मृत्यूदर देखील वाढला आहे. नागपुरातही कोरोनाचा ब्लास्ट काही थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी नागपूर शहर व ग्रामीण भागातील मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेला सुचना दिल्या आहे.
मृत्यूदर हा शून्यवर आणण्यासाठी जास्तीत जास्त नियोजन करा, अशा सुचनाही त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या आहे. आरोग्य अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत या सुचना पाटील यांनी दिल्या. शिवाय नागपूर शहर व ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता आकडा पाहता हे आकडे चिंताजनक असल्याचेही पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर कोरोनाचा वाढता आकडा कसा कमी करता येईल यासाठी नियोजन करणे अत्यंत गरजेचे असल्याचेही पाटील यांनी सांगितले. शिवाय नागपूर शहर व ग्रामीण भागातील एकूण रूग्णसंख्येचा आढावा घेत, कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णसंख्येचा प्रमाण ४६.७६ टक्के असल्याचेही पाटील यांनी सांगितले. शिवाय ग्रामीण भागात आतापर्यंत २७०४५ अँटिजेन टेस्ट आल्याचेही राज्य आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
त्याचबरोबर आरोग्य यंत्रणेने सुसज्ज व सतर्क राहणे देखील तितकेच आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकी दरम्यान आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळा बाबत ही चर्चा करण्यात आली. मनुष्यबळ वाढवीण्याची गरज आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले. शिवाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या मानधनावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत आरोग्य विभागातील सर्व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.